मुंबई- शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तरीही संस्थाचालक शिक्षकांना शाळेत बोलवत आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मात्र अद्यापही यासाठीची दखल गांभीर्याने घेताना दिसत नसल्याची टीका शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. यासाठी पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षणमंत्री सुट्टीचा निर्णय गांभिर्याने घेतील का? शिक्षक आमदार कपिल पाटलांचा सवाल - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तरीही संस्थाचालक शिक्षकांना शाळेत बोलवत आहेत.
राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा अद्यापही पुढे ढकलेल्या नाहीत. शाळांना सुट्टी आहे पण, शिक्षकांना शाळेत बोलावले जात आहे. ग्रामीण भागातही शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला अजून कशाची प्रतीक्षा आहे, असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, उच्च शिक्षण विभागाने तीन दिवसांपूर्वीच निर्णय घेतला आहे. शिक्षण आयुक्तांनी शिफारस करूनही अजून निर्णय झालेला नाही. माझी पुन्हा विनंती आहे की, ३१ मार्च पर्यंत सर्व शाळा, कॉलेज, शिक्षक व कर्मचारी यांना सुट्टी द्यावी. परीक्षा पुढे ढकलाव्यात. फक्त पगारपत्रके २० तारखेच्या आत ट्रेझरीला पोचतील याची काळजी घ्यावी. शिक्षक प्रवास करून येतात. विद्यार्थी जास्त वेळ त्यांच्याच संपर्कात असतात, ही बाब लक्षात घेऊन आजच निर्णय करावा. आणखी उशिर करू नये, अशी विनंतीही पाटील यांनी आपल्या पत्रात केली आहे.