मुंबई -अरबी समुद्रात उठलेले तौक्ते' चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणपट्टीतील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. या जिल्ह्यांमधील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. अनेक महाविद्यालयांच्या इमारतींची पडझड होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून किंवा सरकारच्या निधीतून आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी युवासेना सिनेट सदस्यांकडून करण्यात आली आहे.
महाविद्यालय प्रशासन हवालदिल-
राज्यात 15 ते 17 मे रोजी आलेल्या तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांना बसला. या जिल्ह्यांमधील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. यामध्ये कोकणातील जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. मुंबई विद्यापीठांतर्गत येणार्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांचेही मोठे नुकसान झाले. या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या इमारतींची पडझड होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे महाविद्यालय प्रशासन हवालदिल झालेले आहे. या महाविद्यालयांना तात्काळ मदत करण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे.