महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'लसीचा दुसरा डोस चुकला? काळजी नको, पण पहिल्या डोसपासून 3 महिन्यांच्या आत दुसरा डोस घ्या' - ताज्या बातम्या मराठी

लस टंचाईमुळे यास विलंब होत असेल तर काळजी करू नका, कारण पहिल्या डोसपासून तीन महिन्यांच्या आत लस घेता येईल, अशी माहिती महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर पहिल्या डोसपासून तीन महिन्यांच्या आत दुसरा डोस घेतला नाही, तर लसीचा काहीही परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विशेष बातमी
विशेष बातमी

By

Published : May 3, 2021, 9:57 PM IST

मुंबई- राज्यात कोरोना लसीकरणास 16 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. जवळपास दीड कोटी नागरिकांचा पहिला डोस घेऊन झाला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून राज्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या डोसचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे अनेकांना निश्चित वेळेत दुसरा डोस घेता येत नसल्याचे चित्र असून यामुळे अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. पण दुसरा डोस निर्धारित वेळेत घेणे अत्यंत आवश्यक आहे. लस टंचाईमुळे यास विलंब होत असेल तर काळजी करू नका, कारण पहिल्या डोसपासून तीन महिन्यांच्या आत लस घेता येईल, अशी माहिती महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर पहिल्या डोसपासून तीन महिन्यांच्या आत दुसरा डोस घेतला नाही, तर लसीचा काहीही परिणाम होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए, महाराष्ट्र
दीड कोटींहून अधिक नागिरकांचे लसीकरण
कोरोनामुक्तीसाठी लस हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी नागरिकांना दिल्या जात आहेत. राज्यात सर्वाधिक कोविशिल्ड लस घेतली जात आहे. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 1 कोटी 60 लाखांहुन अधिक लसीचे डोस मिळाले आहे. त्यानुसार आतापर्यंत दीड कोटी जणांचे लसीकरण झाले आहे. यात दुसरा डोस घेणाऱ्यांचाही समावेश आहे. पण यात मोठ्या संख्येने पहिला डोस घेतलेले नागरिक आहेत. तर दुसरा डोस निश्चित वेळेत घेण्यासाठी हे नागरिक लसीकरण केंद्र गाठत आहेत. मात्र अनेक ठिकाणी लसीचा साठा नसल्याने अनेकांना लसीचा दुसरा डोस घेता येत नसल्याचे चित्र आहे.
'कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस 'या' वेळेत घेणे आवश्यक'
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस सध्या राज्यात दिली जात आहे. नियमानुसार कोविशिल्डचा दुसरा डोस 42 ते 56 दिवसांत घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस पहिल्या डोसपासून 28 ते 42 दिवसांच्या आत घेणे आवश्यक आहे. असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले आहे. तर याच नियमानुसार दुसरा डोस दिला जात आहे. नागरिकांकडून घेतला जात आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 15 दिवसांपासून शरीरात कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज तयार होतात. दुसरा डोस घेईपर्यंत 50 टक्के अँटीबॉडीज तयार होतात. दुसरा डोस घेतल्यानंतर पुढील 15 दिवसांनी अँटीबॉडीज तयार होऊन 90 टक्क्यांनी सुरक्षा मिळते. त्यामुळे निश्चित वेळेतच दुसरा डोस घेणे गरजेचे असते. अन्यथा त्याचा परिणाम होत नाही. पण सध्या राज्यात लसीचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. दुसरा डोस न घेता निराश होऊन अनेकांना परतावे लागत आहे. दुसरा डोस 42 ते 56 आणि 28 ते 42 दिवसात नाही मिळाला तर काय? अशी भीती या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. तर दुसरा डोस घेण्यासाठी हे नागरिक धडपडत आहेत. पण डोसच मिळत नसल्याने ही धडपड वाया जात आहे.
दुसरा डोस चुकला तर काय?
कोविशिल्डचा दुसरा डोस 42 ते 56 दिवसांत आणि कोव्हॅसिनचा दुसरा डोस 28 ते 42 दिवसांत घेता नाही आला तर काय? असा मोठा प्रश्न दुसरा डोस मिळू शकत नसलेल्या नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. डॉ. भोंडवे यांच्या म्हणण्यानुसार या निश्चित वेळेतच दुसरा डोस घेणे गरजेचे आहे. पण जर दुसरा डोस या वेळेत मिळतच नसेल तर काळजी करू नका, घाबरू नका. कारण पहिल्या डोसपासून तीन महिन्याच्या आत डोस घेता येतो. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी विलंब झाल्यास काळजी करण्याची गरज नाही. पण कोणत्याही परिस्थितीत पहिल्या डोसपासून तीन महिन्यांच्या आता मात्र दुसरा डोस घ्या, त्यानंतर डोस घेता येणार नाही वा घेऊन त्याचा काहीही फायदा होणार नाही असेही डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे.
'कोणतीही लस घ्या, पण लस घ्याच'
राज्यात आता तरुणांना अर्थात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. पण पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने थोड्या थोडक्याच नागरिकांना लस दिली जात आहे. तर अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण बंद आहे. महत्वाचे म्हणजे दुसरा डोस मिळत नसल्याने नागरिक काळजीत आहेत. अशात तरुणांमध्ये सध्या मोठा उत्साह दिसून येत असून मोठ्या संख्येने ते नोंदणी करत आहेत. मात्र त्याचवेळी अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे लस कोणती घ्यावी. याविषयी डॉ. भोंडवे सांगतात, दोन्ही लस कोरोना विरोधात परिणामकारक आहेत. कोविशिल्ड 91 टक्के तर कोव्हॅक्सिन 90 टक्के सुरक्षा देते. महत्वाचे म्हणजे आता रशियाची स्फुटनिक 5 लसही उपलब्ध होणार आहे. ही लस 95 टक्के सुरक्षा देते. त्यामुळे अजूनपर्यंत ज्यांनी एकही डोस घेतला नाही. त्यांनी स्फुटनिक लस घेणे चांगले होईल. पण स्फुटनिक असो वा कोविशील्ड, कोव्हॅक्सिन, कोरोनापासून वाचण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. मग ती कोणतीही का असेना लस घ्या. हे आपले राष्ट्रीय कर्तव्य तर आहेच, पण मानवतेच्या दृष्टीने लस घेणे गरजेचे आहे. तेव्हा येत्या काळात प्रत्येकाने हे कर्तव्य पार पाडा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details