मुंबई -लॉकडाऊन ठेवायचा की नाही, याबाबत काहीही निर्णय घ्या, पण माणसाचा माणूस म्हणून विचार करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला केले आहे. तसेच आता जनजीवन सुरू केले पाहिजे, नाहीतर लोकं वेडे होतील, अशी भीतीदेखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
कोविड हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे त्यावर सरसकट भाष्य करता येणार नाही. यातील तारतम्य सांभाळले पाहिजे. किती दिवस आपण निर्बंध ठेवणार आहोत? लसीकरण झालेल्यांना मुभा दिली पाहिजे. दुकाने, मंदिरे उघडली पाहिजे की नाही, टुरिजम सुरू करायचे की नाही हे ठरवले पाहिजे. कोरोनाचे दोन डोस घेतल्यानंतरचा धोका हा मर्यादित आहे. आता जनजीवन सुरू केले पाहिजे. नाही तर लोकं वेडे होतील. दोन वर्षे वारकरी पंढरीला गेला नाही. त्यामुळे काय निर्बंध लावायचे ते एकदाच ठरवा, पण ते लावण्याआधी माणसाचा माणूस म्हणून आधी विचार करा, असे पाटील म्हणाले.
- काँग्रेसचा मेळावा होईल? -
धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेच धोरण करण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली आहे. पंतप्रधान त्याबाबत विचार करतील. त्यातून काही प्रोटोकॉल किंवा आचारसंहिता ठरली तर 29 जुलै रोजी होणारा काँग्रेसचा मेळावा त्यात बसतो का, हे बघण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा -संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उद्योग क्षेत्राचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बारामतीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यावर पाटील यांनी टीका केली. तो मेळावा महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील आहे. महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी हा मेळावा असेल. आम्हीही ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी जेलभरो आंदोलन केले. परंतु, ओबीसी आरक्षणाबाबत त्यांचा रोख जर केंद्र सरकारकडे असेल तर त्याचा अर्थ त्यांना कायदा कळत नाही असा होतो. या मेळाव्यासाठी सर्व पक्षीयांना आमंत्रण देणार असतील तर आम्ही कुणासोबतही जायला तयार आहोत. शेवटी ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
- राठोड हा शिवसेनेचा विषय -
शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची चर्चा आहे. त्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संजय राठोड यांच्याबाबतची जनहित याचिका कोर्टात आहे. पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देणं चिंताजनक आहे. पण हा न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचा विषय आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात घ्यावे की घेऊ नये हा शिवसेनेचा विषय आहे. राठोड काही आमचे दुश्मन नाहीत आणि शिवसेना तर आमची बिलकूल दुश्मन नाही. एखाद्याने गुन्हा केला तर त्याला शिक्षा होते ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गुन्हेगाराला शासन होतं हे सामान्य लोकांना वाटते, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा -नाना पटोले यांचे वक्तव्य गैरसमज निर्माण करणारे -दिलीप वळसे पाटील