..नाहीतर सदनाच्या गॅलरीतून उडी मारेन - आमदार संदीप धुर्वे - अर्थसंकल्पीय अधिवेशन
अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरत असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचे निलंबन करावे, नाहीतर विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारेन, अशी धमकी आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी दिली. यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला.
मुंबई -अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरत असून भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचे निलंबन करावे, नाहीतर विधानसभेच्या गॅलरीतून उडी मारेन, अशी धमकी आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी दिली. यानंतर विधानसभेत एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार यांच्यात घोषणाबाजी झाली. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना विनंती केली की सदस्य सभागृहात आत्महत्येची धमकी देत आहेत, हे योग्य नाही.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीत नगरपरिषदेच्या बांधकामात अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी आरोप होता. मान्सूनपूर्व कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नगरसेवक लक्ष्मण पठाडे यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली होती. सदर मान्सूनपूर्व कामाची चौकशी जिल्हा परिषदेने स्थळ पाहणी करून करण्याची मागणी सुद्धा केली होती. यासंबंधी चौकशी सुरू असली तरी अधिकाऱ्याला निलंबित केलं नसल्याने अधिकाऱ्याचे निलंबन करावे, अशी मागणी करणारा प्रश्न आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी केला होता. त्या प्रश्नावर चर्चा सुरू होती. त्यात सार्वजनिक बांधकांम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ दिवसात चौकशी पूर्ण करून दोषी अधिकाऱ्याचे निलंबन करण्याचे आश्वासन दिले. मात्र अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन केलं गेलं पाहिजे असा मुद्दा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार संदीप सुर्वे यांनी उपस्थित केल्याने विधानसभेत गोंधळ सुरू झाला.