मुंबई -काही दिवसांपूर्वी मुंबईतील मंत्रालयामध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा मेल आला होता. या संदर्भात पुण्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा मुंबईतील कुलाबा परिसरातील ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी कॉल आला होता. दरम्यान, हा कॉल एका लहान मुलाने केला असल्याचे माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ताज हॉटेलच्या कार्यालयात सदरचा निनावी कॉल आला होता. या कॉलद्वारे ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर तत्काळ यासंदर्भात मुंबई पोलिसांना याची सूचना देण्यात आली. यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाने जाऊन तपासणी केली. सदरचा हा कॉल बनावट असल्याचे समोर आले आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ताज हॉटेलची तपासणी केली असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बॉम्ब आढळून आलेला नाही.
- ताज हॉटेलला निनावी फोन केला होता एका लहान मुलाने -
ताज या पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन आल्यानंतर या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. यामध्ये आणखी एक खुलासा होत आहे. ताजच्या मॅनेजमेंटला आलेला कॉल हा एका लहान मुलाने केला होता, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदर या कॉलद्वारे ताज हॉटेलमध्ये 2 बंदुकधारी व्यक्ती घुसणार असून, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती.
- कराडमधील अल्पवयीन मुलाची चौकशी सुरू
ताज हॉटेलला धमकीचा कॉल केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील कराड येथील 9 वीत शिकणाऱ्या मुलाची व त्याच्या वडिलांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अल्पवयीन मुलाने ताज हॉटेलला कॉल करून या हॉटेलमध्ये दोन बंदूकधारी व्यक्ती शिरणार असून, बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी दिली होती. मात्र, या गोष्टीची कल्पना या मुलाच्या वडिलांना नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सदरच्या या अल्पवयीन मुलाने फोन करून, ताज हॉटेलच्या मागच्या गेटवर सुरक्षा वाढवा, कारण 2 व्यक्ती मास्क घालून बंदूक घेऊन ताजमध्ये घुसणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी याचा तपास करत सदरच्या अल्पवयीन मुलाला शोधून काढले असून पुढील चौकशी सुरू आहे.