मुंबई – अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी पाटणा पोलिसांनी चार पोलीस अधिकारी पाठविले आहेत. मुंबई पोलिसांकडून अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत होणाऱ्या तपासाबाबत पाटणा पोलीस असमाधानी आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू होऊन महिना उलटला असला तरी मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. या तपासाबाबत सुशांतसिंहचे कुटुंबीय समाधानी नसल्याची चर्चा आहे. अभिनेता सुशांतसिंहचे मानसिक स्वास्थ्य ठीक नव्हते. हे त्याच्या मृत्यूचे कारण सांगितले जात असताना त्याबाबत सुशांतसिंहचे कुटुंब नाराज आहेत.
नुकतेच, सुशांतसिंहच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली जात नाही, असा प्रश्न त्याच्या एका चाहत्याने सुशांतसिंहची बहिण श्वेता सिंग किर्तीला विचारला होता. त्यावर तिने मुंबई पोलिसांच्या अहवालाची प्रतिक्षा करत असल्याचे चाहत्याला उत्तर दिले होते. पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही तिने चाहत्याला सांगितले होते.
गेल्या दोन दिवसात मुंबई पोलिसांनी दिग्दर्शक, निर्माते महेश भट्ट आणि धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्वा मेहता यांची चौकशी केली आहे. दिग्दर्शक करण जोहर यांचीही मुंबई पोलीस या आठवड्यात चौकशी करणार आहेत. तर अभिनेत्री कंगना रानावतलाही पोलिसांनी समन्स धाडले आहे.