मुंबई -सुशांतसिंह राजपूत प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून (सीबीआय) चौकशीसाठी 5 पथके बनविण्यात आली आहेत. यातील एक पथक मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. सुशांतसिंह प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे, पुरावे, पंचनामा, 56 व्यक्तींचे जबाब, सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित फॉरेन्सिक ऑडिट अहवाल, सुशांतचा पोस्ट मार्टम रिपोर्ट यासह इतर माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांशी सीबीआयचे पथक समन्वय साधत आहे.
हेही वाचा -अनिल देशमुख यांचा सावध पवित्रा; म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणावर अभ्यास करून बोलणार
दरम्यान, सीबीआयच्या इतर पथकांडून तपास सुरू करण्यात आला आहे. यात सुशांतसिंहच्या वांद्र्यातील घरात जेवण बनवण्याचे काम करणाऱ्या नीरज याची सीबीआयकडून चौकशी सध्या सुरू आहे. आता टप्प्याटप्याने या प्रकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी केली जाणार आहे. सध्या तपासाअंती सुशांतसिंहचा स्वयंपाकी नीरज याची चौकशी करण्यात येत असून पुढच्या टप्प्यात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतसिंहचा मित्र महेश शेट्टी, सिद्धार्थ पिठानी या सगळ्यांची चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे.