कोल्हापूर- देशभरात आज केंद्रा सरकारच्या कृषी कायद्याविरोधात भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज कोल्हापुरात क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या सदस्यांनी स्वतःला गाडून घेऊन या भारत बंदला पाठिंबा दिला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कोल्हापुरात स्वतःला गाडून घेऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा - स्वतःला गाडून घेऊन शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
आज भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आणि दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायदा विरोधी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी कोल्हापूरात एक अनोखे आंदोलन करण्यात आले. या कायद्यामुळे भारतातील शेतकरी जमिनीत गाडला जाणार आहे याचे प्रतिक म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःला गाडून घेत आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या समर्थनाथ आज संपूर्ण देश रस्त्यावर उतरला असून केंद्र सरकारचा लागू केलेला कृषी विधेयक कायदा रद्द करा, अशी मागणी आंदोलनाद्वारे केली आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातदेखील भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट आहे. कोल्हापुरात भाजप वगळता जवळपास सर्वच पक्षांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात आज क्रांतिसिंह नाना पाटील नगर कृती समितीच्या सदस्यांनी स्वतःला गाडून घेऊन केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध व शेतकऱ्यांच्या समर्थनात हे आंदोलन केलं.
हजार वर्षापूर्वी बळीराजाला व्यापारी प्रवृत्तीने गाडले. याचीच पुनरावृत्ती या कृषी कायद्याच्या माध्यमातून होणार आहे. कृषी कायद्यामुळे शेतकरी पुन्हा गाडला जाणार आहे. त्याचे भूमिपुत्र म्हणून आम्ही स्वतःला गाडून घेत केंद्र सरकारच्या या कायद्याचा निषेध करत आहोत. असे कृती समितीचे सदस्य व माजी नगरसेवक अमोल माने म्हणाले, कृषी विधेयक मागे घेऊन सरकारची जुलमी व्यवस्था बंद करावी, शेतकऱ्यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी देखील यावेळी माने यांनी केली.