मुंबई - शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यांवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैफल्याग्रस्त भावनेतून अनंत गीते यांनी वक्तव्य केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'गीतेंचे वक्तव्य नैराश्येतून' -
शिवसेना आणि भाजप युती काळात खासदार झालेले अनंत गिते हे भाजपाच्या ओझ्याखाली दबलेले असल्याची बोचरी टीका तटकरेंनी केली. ते म्हणाले, माजी मंत्री अनंत गीतेंचा स्वाभिमान मागच्या निवडणुकीत गळून पडला असून नैराश्येतून त्यांनी हे वक्तव्य केले असावे. सहन करता येत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अनंत गीतेंची सध्याची अवस्था आहे, असेही तटकरे म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात तटकरे म्हणाले, की गीतेंना समज द्यावी का, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असाही विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. स्थानिक पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे संबंध हे सौहार्दपूर्ण असल्याचेही तटकरेंनी सांगितले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते यांना पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर अनंत गीते राजकीय अज्ञातवासात गेले. त्यातच महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर शिवसेनेकडूनही त्यांची दखल घेण्यात आली नाही. तसेच अनंत गीते आता शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना, याबाबतची बैठक बांद्रातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याठिकाणी गीतेंनी शरद पवारांना वाकून त्यांनी नमस्कार केला होता. याचा स्वतः मी साक्षीदार होतो, असेही सुनील तटकरे म्हणाले.