मुंबई- उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खीरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून बसची तोडफोड करणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी. तसेच आज दिवसभर बसेस बंद राहिल्याने बेस्टचे सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे, अशी मागणी बेस्ट समितीचे भाजप सदस्य सुनिल गणाचार्य यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली आहे.
8 बसेसची तोडफोड
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्यांवर गाडी चालवून त्यांना चिरडून मारण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रात्रीपासून बंदला सुरुवात झाली. बंदमध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बेस्ट कामगार सेनेने केले होते. या दरम्यान बेस्टच्या बसेस डेपो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असतानाच 8 बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल, अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.
पोलीस सुरक्षेची मागणी
बंद दरम्यान बेस्ट डेपो बाहेर काढण्यात येणाऱ्या बसेसवर दगडफेक होऊन 8 बसचे नुकसान झाले आहे. बसेसवर दगडफेक करणारे अज्ञात इसम आहेत. त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ असते तर त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करून नुकसान भरपाई वसूल करता आली असती. मात्र, असे फोटो किंवा व्हिडिओ नसल्याने ही नुकसान भरपाई बेस्टला स्वतःच्या खिशातून भरावी लागते. बस सेवा सुरू करण्यासाठी पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. पोलिसांकडून सुरक्षा मिळताच बेस्ट सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे..
सरकारने नुकसान द्यावी भरपाई
बेस्ट तोट्यात आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या बंद दरम्यान बेस्टच्या आज 8 बसेसची तोडफोड झाली आहे. मुंबईत बहुतेक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्यामाध्यमातून बसवर दगडफेक करणाऱ्या लोकांचा सरकारने आणि पोलिसांनी शोध घ्यावा. त्यांना पकडून नुकसान भरपाई वसूल करावी. तसेच बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीमधून दिवसाला सुमारे सव्वा दोन कोटींचे उत्पन्न मिळते. आज बंदमुळे दिवसभर बस डेपो बाहेर निघाल्या नसल्याने बेस्टचे दिवसभर मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. यामुळे ही सर्व नुकसान भरपाई बंदची हाक देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आणि सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांनी भरून द्यावी, अशी मागणी भाजपचे बेस्ट समितीतील सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली आहे.
हेही वाचा -महाराष्ट्र बंद दरम्यान बेस्टच्या 8 बसेसची तोडफोड, प्रशासनाने मागितले पोलीस संरक्षण