मुंबई - मंत्रालयात शुक्रवारी पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका तरुणीने मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, खाली असलेल्या सुरक्षारक्षक जाळीवर पडल्यामुळे ती वाचली. प्रियांका गुप्ता, असे या तरुणीचे नाव आहे. मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्रालयात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न हेही वाचा... 13 डिसेंबर 2001 : भारतीय संसदेच्या इतिहासातला काळा दिवस
राज्याच्या मंत्रालयात आत्महत्या करण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. राज्यात सरकार स्थापन होऊन महिन्याचा कालावधी उलटला नाही तोच आज शुक्रवारी मंत्रालयात एका तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांच्या कारवाईमुळे त्रस्त असल्याने आपल्याला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी न्याय द्यावा, अशी मागणी करण्यासाठी ही तरुणी आली होती, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, तिला मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा... #PlasticFreeIndia: पानांचे द्रोण ठरत आहेत प्लास्टिकमुक्त भारतासाठी वरदान !
दुपारी ४ च्या सुमारास उल्हासनगर येथे राहणाऱ्या प्रियांका गुप्ता हिने मंत्रालयात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांका गुप्ता हिच्या पतीचे ज्यूस सेंटर उल्हासनगरमध्ये सुरू होते. मात्र, त्यावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, त्यात आपल्यावर अन्याय झाला असल्याने त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, यासाठी गुप्ता ही आज मंत्रालयात आली होती. मात्र, आपली कोणीही दखल घेत नसल्याचे लक्षात आल्याने तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहितीही समोर आली आहे.