महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

केईएम रुग्णालयात हात ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी, २१ वर्षीय तरुणाला मिळाला नवा हात - हात ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी

ओकहार्ड रुग्णालयातील ब्रेन डेड व्यक्तीचा हात केईएम रुग्णालयातील एका रुग्णाला अवयव प्रत्यारोपण करून लावण्यात आला आहे. ही धाडसी शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने यशस्वी केली असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

केईएम
केईएम

By

Published : Aug 12, 2021, 5:55 PM IST

Updated : Aug 12, 2021, 6:04 PM IST

मुंबई - मानवाचे अनेक अवयव प्रत्यारोपण केले जातात. मात्र मुंबई महापालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयात एक अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ओकहार्ड रुग्णालयातील ब्रेन डेड व्यक्तीचा हात केईएम रुग्णालयातील एका रुग्णाला अवयव प्रत्यारोपण करून लावण्यात आला आहे. ही धाडसी शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने यशस्वी केली असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. हाताचे प्रत्यारोपण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पहिल्यांदाच झाले आहे.

डॉ. हेमंत देशमुख यांची प्रतिक्रिया

२४ तासाच्या शत्रक्रियेनंतर प्रत्यारोपण

मध्यप्रदेशमधील एका २१ वर्षीय तरुणाचे दोन्ही हात निकामी झाले. त्याला मुंबई महापालिकेच्या परेल येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच ओकहार्ड रुग्णालयातील ब्रेन डेड घोषित रुग्णाचा हात मिळणार असल्याची माहिती केईएम रुग्णालयाला मिळाली. मृत व्यक्तीचा हात मिळणार असल्याने रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाने हात प्रत्यारोपण करण्याची तयारी सुरू केली. हात प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया २४ तास सुरू होती, ती आज (गुरूवारी) सकाळी ४ वाजता संपली. या शस्त्रक्रियेनंतर २१ वर्षीय तरुणाला नवा हात मिळाला आहे. पुढील वर्षभर औषध उपचार घेतल्यानंतर तसेच व्यायाम केल्यावर या तरुणाला प्रत्यारोपण करण्यात आलेला हात योग्यरित्या काम करत आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे.

धाडसी शस्त्रक्रिया

याबाबत बोलताना, इतर अवय प्रत्यारोपण करणे सोपे असते, त्याची एसओपी ठरलेली असते. हात प्रत्यारोपण करणे कठीण असते. १२ ते ३६ तासापर्यंत शस्त्रक्रिया करावी लागते. या केसमध्ये दोन ते तीन दिवस आधीच हात प्रत्यारोपण करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आमच्या रुग्णालयातील डॉ. विनिता पुरी यांच्या टीमने तयारी केली होती. ही शस्त्रक्रिया कशी केली जाईल याची रंगीत तालीम करण्यात आली. २४ तास चाललेली उजव्या हातावरील शस्त्रक्रिया आज पहाटे ४ वाजता संपली. सध्या हा रुग्ण अवयव प्रत्यारोपण विभागाच्या आयसीयूमध्ये आहे. ही धाडसी शस्त्रक्रिया आहे. २ रोहिणी, ४ निला, मांस आदींची जुळवाजुळव करणे आव्हानात्मक असते. ते काम आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी केले आहे, असे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

'टीमवर्कमुळे शक्य'

हाताची शस्त्रक्रिया करून हात प्रत्यारोपण करायचा आहे, याची माहिती मिळताच आम्ही तयारी सुरु केली होती. आम्ही सर्वच विभागाच्या डॉक्टरांनी टीमवर्क करून ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या रुग्णाचा हात प्रत्यारोपित करण्यात आला आहे. पुढील वर्षभर या रुग्णाला मुंबईत राहावे लागेल. या कालावधीत त्याला औषधे दिली जातील. तसेच हात योग्य प्रकारे काम करावा यासाठी व्यायाम करून घेतला जाईल. एक वर्ष पूर्ण झाल्यावर हात कसा काम करत आहे, हे सांगू असे प्लास्टिक सर्जन विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांनी सांगितले.

हेही वाचा -जय मोदी बाबा! वाढत्या महागाईच्या विरोधात 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी केली पंतप्रधानांची उपरोधिक आरती

Last Updated : Aug 12, 2021, 6:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details