मुंबई -आर्थिक गुन्हे गैरव्यवहार प्रकरणात (Money Laundering Case) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करण्यात आल्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांना देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करून दोन आठवड्यांत अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
वाढत्या वयामुळे देशमुखांना जामीन देण्याची विनंती - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या देशमुखांना ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केली. पीएमएलए न्यायालयाने 18 मार्च रोजी देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानिर्णयाला देशमुखांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. आरोग्याच्या कारणास्तव तसेच त्यांचे वाढते वय पाहता जामीन देण्याची विनंती करण्यात आली. देशमुख ७३ वर्षांचे असून त्यांचा खांदा निखळला आहे आणि उच्च रक्तदाब यासह विविध आजारांनी ते ग्रस्त आहेत. या आजारांमुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यांना सतत आधार आणि मदतीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे देशमुखांना जामिनावर सोडण्याची विनंती वकिलांनी केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली.