मुंबई - 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, असे अश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षनेते आणि काही आमदारांनी सामाजिक न्याय मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबद्दल प्रश्न विचारत धारेवर धरले.
दरम्यान, 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल, असे मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानभवनात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. काही कॉलेजच्या बँक खात्यांवर ही शिष्यवृत्ती जमा झाली नसली तरी कॉलेजकडून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी सामाजिक न्याय विभागाकडून घेतली जाईल. पर्सनल मॅनेजमेंट सिस्टिममुळे शिष्यवृत्तीला वेळ होत आहे. ही सिस्टीम केंद्र सरकारची आहे. शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकार पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.