मुंबई -१ नोव्हेंबरपासून सर्व महाविद्यालय आणि त्यांच्या शैक्षणिक सत्राची सुरूवात करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना नुकत्याच जाहीर केल्या आहेत. मात्र, राज्यात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने ही महाविद्यालयं एक नोव्हेंबरपासून सुरू केली जाऊ नयेत, यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्यक्षात जमत नसली तरी त्यांचे ऑनलाईन, व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षण सुरू राहिले पाहिजे, असे मत विद्यार्थ्यांसोबतच काही प्राचार्यांनीसुद्धा व्यक्त केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच सर्व महाविद्यालय आणि त्यांच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात ही १ नोव्हेंबरपासून केली जावी, यासाठीच्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यासाठी यूजीसीने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले आहे, याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल राज्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव याची एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन युजीसीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी तातडीने करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -'रोहित पवारांनी शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरून आपली उंची मोजावी'
कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अंतिम परीक्षेवर सुरुवातीला मंत्री सामंत यांनी अशीच भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर ही यूजीसीने आपले आडमुठी भूमिका कायम ठेवल्यामुळे शेवटी राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागत आहेत. यामुळे १ नोव्हेंबरपासून महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयावर राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये यूजीसी विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर काही विद्यार्थी संघटनांनी यूजीसीचे समर्थनही केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या भूमिकेच्या वेगळी प्राचार्यांची भूमिका नाही, असे मत प्राचार्य तुकाराम शिवार यांनी व्यक्त केले. कोरोना आणि त्याची परिस्थिती लक्षात घेता कोणतेही महाविद्यालय सुरू होणे कठीण आहे. यूजीसीने गाईडलाईन दिल्या असल्या तरी मुंबईत असलेली परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे आणि परिस्थितीनुसार निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले. तरीसुद्धा मंत्री उदय सामंत महाविद्यालय सध्या सुरू होणार नाहीत, या विषयी जो निर्णय जाहीर करत आहेत, त्याला आमच्या प्राचार्य असोसिएशनचा पाठिंबा असल्याचे प्राचार्य शिवारे यांनी सांगितले.