मुंबई -पवईच्या आयआयटी मेन गेट समोर असलेल्या बेस्ट बस स्थानकावर एका विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. निखिल शहा (२१) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
पवईत विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ - Pawai IIT
पवईतील आयआयटी मेन गेट समोरील बेस्ट बस स्थानकावर एका विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
निखिल हा पवईच्या आयसीएफए बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. १२ जुलैला संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तो रस्त्यावर पडला होता. त्याच्या डोक्यावर मागच्या बाजूस मार लागला होता. त्यामुळे एका अनोळखी व्यक्तीने त्याला जवळच असलेल्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी निखिलच्या कुटुंबीयांना तो कोमामध्ये असल्याचे सांगितले. पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. निखिलच्या मृत्यूचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्याला एखाद्या मोकाट जनावराने किंवा अज्ञात वाहनाने धडक दिली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पवई पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवई आयआयटी मेन गेट समोर ही घटना घडली असल्याने इतक्या मोक्याच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस गर्दी असूनही निखिल सोबत काय घडले, याचा थांगपत्ता कोणालाच लागला नाही. त्यामुळे पवई पोलीस सध्या यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.