मुंबई -सातवी पास असलेल्या प्रतीक्षा तोंडवळकर ( Pratiksha Tondwalkar ) यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ( State Bank of India ) सफाई कामगार म्हणून कामाची सुरुवात केली. मात्र, आज त्या बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. "मेहनतीला कोणताही पर्याय नसतो" असं वाक्य अनेकदा आपल्या वाचनात आल असेल किंबहुना अनेक वेळा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून हे वाक्य ऐकत आलो आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या अनेक लोकांचा आदर्श आपण पाहत आलोय. मात्र, यशासाठी त्यांनी खाल्लेल्या खस्ता या आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात.
अपार कष्ट करून केले धेय्य साध्य - आपल्याला हवं ते ध्येय संपादन करण्यासाठी परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक मोर्चांवर लढाई लढावी लागते, जिंकावीही लागते. असंच आपलं ध्येय संपादन करण्यासाठी अपार कष्ट करणार सामान्य महिलेचे नाव म्हणजे प्रतीक्षा तोंडवळकर हे आहे. 57 वर्षीय प्रतीक्षा तोंडवळकर ह्या आज एका प्रतिष्ठित सरकारी बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजरच्या पदावर काम करतात. मात्र, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम हे असामान्य आहेत. प्रतीक्षा तोंडवळकर या सध्या मुंबईत सांताक्रूझ या ठिकाणी राहत असून बांद्रा येथील प्रतिष्ठित सरकारी बँकेमध्ये जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. मात्र आज जरी त्या बँकेच्या जनरल मॅनेजर असल्या तरी त्यांनी आपल्या बँकेची कारकीर्द ही सफाई कामगार म्हणून सुरू केली होती.
बँकेत होत्या चपराशी - प्रतीक्षा तोंडवळकर यांचा वयाच्या 17 व्या वर्षी सदाशिव कडू यांच्याशी 1981 साली लग्न झाले. त्यांचे पती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ( State Bank of India ) बायंडरचे काम करायचे. मात्र, 1984 साली त्यांच्या पतीचे आकस्मित निधनानंतर प्रतीक्षा तोंडवळकर यांचं सर्व जगत हरपल होत. वय वर्ष केवळ 20 असतांना पदरात दोन मुले होती. पतीची साथ सुटलेल्या प्रतीक्षा तोंडवळकर यांना त्यावेळी नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. त्यातच शिक्षण फक्त सातवी पर्यंत झालं असल्याने नोकरी कोणती शोधायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असताना पती काम करत असलेल्या बँकेत त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांची नोकरी करण्यास सुरुवात केली. पती हयात असताना त्यांनी नेहमीच प्रतिक्षा तोंडवळकर यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं होतं. तीच प्रेरणा त्यांनी आपल्या सोबत कायम ठेवली. नोकरी करता करता त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कारण आयुष्यात पुढे जायचं असेल तर शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे हे त्यांच्या पत्नी त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे आपलं, आपल्या मुलांचे भविष्य चांगलं करायचं असेल तर, शिक्षणाशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाही त्याची कल्पना प्रतीक्षा तोंडवळकर यांना होती. त्यामुळे नोकरी, घर यासोबतच शिक्षण त्यांनी सुरू ठेवलं.
ट्रैनी ऑफिसर म्हणून सिलेक्ट-दहावी उत्तीर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुंबईतील एसएनडीटी महाविद्यालयात ( SNDT College ) त्यांनी प्रवेश घेतल. या महाविद्यालयात त्यांनी आपलं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कॉमर्स मधून पदवी ( Degree in Commerce ) प्राप्त केल्यानंतर बँकेत त्यांना पहिल्यांदा क्लर्क म्हणून रुजू झाल्या. मात्र, क्लर्क म्हणून काम करत असताना देखील अंतर्गत परीक्षासाठी त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. अंतर्गत परीक्षा पास करून पहिल्यांदा त्या ट्रैनी ऑफिसर म्हणून सिलेक्ट ( Selection as Trainee Officer ) झाल्या. त्यानंतर एकेक पदावर बढती मिळवत त्यांनी आज बँकेच्या असिस्टंट जनरल मॅनेजरची ( Assistant General Manager ) पदवी मिळवली. त्यांचा हा सर्व प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. मात्र त्या स्वतः शिकत असताना आणि आपल्या मुलांसाठी शिक्षण कुठे थांबू दिलं नाही. त्यांचा मोठा मुलगा विनायक मुंबई आयआयटी येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्या नंतर पुण्यातल्या एका नामांकित कंपनीमध्ये उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहे. तर, त्यांची मुलगी दीक्षा व्यवसाय करते. या दरम्यानच त्यांनी प्रमोद तोंडवळकर यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, आपल्या दुसऱ्या विवाहानंतर देखील त्यांनी आपली मुलं, जबाबदारी या चौख पार पाडल्या. या जबाबदाऱ्या पार पाडत असताना पती प्रमोद तोंडवळकर यांची मोलाची साथ त्यांना लाभली.