मुंबई - मास्क न लावणाऱ्याविरोधात मुंबई महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पण ही कारवाई म्हणावी तितकी व्यापक आणि तीव्र दिसत नाही. त्यामुळेच मुंबईत मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या जास्ती आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांचीही संख्या वाढत आहे. त्यानंतर आता पालिकेला जाग आली आहे. पालिकेने मास्क न लावणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी उद्यापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार उद्यापासून 24 वॉर्डमध्ये 15 जणांची टीम तैनात केली जाणार असून ही टीम मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्याचवेळी दंडाची रक्कम 1 हजारवरून 200 रुपये करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि कारवाईला वेग यावा यादृष्टीने रक्कम कमी करण्यात आल्याचेही काकाणी यांनी सांगितले आहे. मार्चपासून मुंबईकडे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पाहिले जात होते. पण ऑगस्टमध्ये पालिकेने मुंबईत कॊरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आणला. मात्र, आता सप्टेंबरमध्ये कॊरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. कॊरोनाच्या रुग्णांमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. तर या वाढीमागे मुंबईकरांचे बेजबाबदार वागणेच कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे-तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुंबईत मास्क न लावता फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णवाढीमागे हे मुख्य कारण मानत पालिकेने आता मास्क न लावणाऱ्यांविरोधातील कारवाई कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्क न लावणाऱ्यांविरोधात सुरुवातीपासून कारवाई होत आहे. पण तरीही लोकांना त्याचा वचक बसताना दिसत नव्हता. तेव्हा आता ही कारवाई आणखी व्यापक करत कारवाईचा वेग वाढवण्यात येणार आहे. त्यासाठीच उद्यापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.