मुंबई- मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मुंबईमध्ये तर दर दिवशी पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय रविवारी घेतला. त्यांनी याबाबत पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. दरम्यान पत्रकार परिषदेपूर्वी अस्लम शेख यांनी मुंबईतील महत्त्वाच्या मार्केटला भेट दिली होती. त्याठिकाणी त्यांना गर्दी आढळल्याने त्यांची चिंता व्यक्त केली.
काय होणार बंद?
मुंंबईत आता अधिक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार धार्मिक स्थळे सर्वांसाठी बंद करण्यात आले आहेत. आता धार्मिक स्थळी केवळ दैनंदीन धार्मिक विधी करण्यासाठी ठरावीक लोकांना जाण्याची परवानगी असेल. सिनेमागृहे आणि नाट्यगृहे पूर्णपणे बंद असणार आहेत. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शुटिंगला देखील बंदी घालण्यात आली आहे. बसेस व ट्रॅव्हल यांना 50 टक्के प्रवाशांची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र या निर्बंधांमधून मद्याच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत मंत्रीमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये अस्लम शेख यांनी दिली.
हेही वाचा -बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार