महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Still A Big Battle Ahead : ही लढाई छोटी; अजून मोठी लढाई बाकी आहे - फडणवीस - BJP Celebration

राज्यसभा निवडणूक ही तर छोटी लढाई होती. मोठी लढाई अद्याप बाकी आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आपल्या आगामी काळातील रणनीतीचे सुतोवाच केले. भाजपचे राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election ) तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजपतर्फे भाजप प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा ( BJP Celebration ) करण्यात आला. याप्रसंगी फडणवीस बोलत होते.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Jun 11, 2022, 3:24 PM IST

Updated : Jun 11, 2022, 4:42 PM IST

मुंबई -भाजपचे राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election ) तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे भाजपतर्फे भाजप प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण ज्योतिरादित्य शिंदें, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, नवनिर्वाचित खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील( Chandrakant Patil ) व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.

विजय जगताप, टिळक यांना समर्पित -देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनंजय महाडिक यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त घेत निवडून येऊन नवीन इतिहास रचला आहे. या विजयाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक आहेत. त्यांना हा विजय समर्पित करायला हवा. कारण शारीरिक स्थिती नसतानाही प्रचंड रिस्क घेऊन ते मतदानाला आले. आपण जिंकल्यानंतर अनेक लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काहींचे चेहरे पडले आहेत. काही लोक बावचळले आहेत, काही पिसाटले आहेत. आपण जिंकलो आहोत आणि जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. आनंद साजरा करायचा असतो. उन्माद करायचा नसतो. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करूया.

सरकार टिकवणे यांना महत्वाचे आहे? -ते सांगतात त्यांना माहीत आहे, कोणामुळे हे जिंकले. त्यांना हे खरंच माहीत असेल तरी ते काही करणार नाहीत. याचे कारण त्यांच्यावर कार्यवाही करायला गेले तर यांचे सरकार राहणार नाही. कारण सरकार टिकवणे महत्वाचे आहे. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत. इथे खुले मतदान असूनही आपल्याला जिंकवले. तिथे तर गुप्त मतदान आहे. सद्सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान होणार आहे. मला असे वाटते या निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. महाराष्ट्र थांबलाय. आम्ही सुरू केलेले प्रकल्प थांबवले आहेत. या महाराष्ट्रचे अतोनात नुकसान सुरू आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा फायदा होत आहे. आज सर्वकाही त्यांच्या घशात जात आहे, पण हे सरकार चकार शब्द काढायला तयार नाही. शेतमाल खरेदीची अवस्था फार वाईट आहे. राज्यातील प्रोजेक्ट बंद, मुंबईतील प्रोजेक्ट बंद आहेत. विजेचा तुटवडा आहे, लोड शेडिंग सुरू आहे. यामुळे राज्य मागे पडले आहे. तुम्ही जरी बेईमानाने राज्य घेतले असले तरी तुम्ही राज्यकर्ते आहात हे लक्षात ठेवा. केवळ बदला घेण्याच्या भूमिकेने वागू नये, असे फडणवीस म्हणाले.

नशीब माझं मुंबईत घर नाही -मी नशीबवान आहे. माझं मुंबईत घर नाही, नाहीतर मलाही नोटीस आली असती. जर नोटीस द्यायची झाली तर ती सरकारी बंगल्याला द्यावी लागेल. नाहीतर राणे साहेब मलाही नोटीस आली असती, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. २०१९ साली मोदींवर विश्वास ठेवून जनतेने आम्हाला व शिवसेनेला सत्ता दिली होती. पण यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला व सत्तेत आले. आता आहे ती सत्ता तरी चालून दाखवा. किमान दोन जनहिताची कामे तरी करून दाखवा, असेही फडणवीस म्हणाले. सर्व केंद्राच्या भरवशावर चालू आहे. अजूनही महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे भाव हे कमी करायला तयार नाहीत. ही निवडणूक म्हणजे छोटी लढाई होती. मोठी लढाई बाकी आहे. सर्व निवडणुकांत विजय संपादन करायचा आहे. उत्साह कायम ठेवा, पण उत्साहात वाहून जाऊ नका, असे सांगत आमची विजयाची मालिका अशीच सुरू राहणार, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा -Dhananjay Mahadik : देवेंद्र फडणवीस हेच आजच्या विजयाचे खरे शिल्पकार : धनंजय महाडिक

Last Updated : Jun 11, 2022, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details