मुंबई -आयकर चोरी प्रकरणी आयकर विभागाकडून राज्यभर छापे टाकण्यात आले. युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवर छापा टाकण्यात आला. युएईजीचे सर्वेसर्वा जेसस लाल यांच्या घर आणि कार्यालयांवार छापेमारी करण्यात आली. मुंबईतील 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली तर, ठाण्यात एका ठिकाणी, वसईत दोन ठिकाणी, नाशिकमध्ये 3 ठिकाणी, औरंगाबादेत एका ठिकाणी, मीरा भाईंदरमध्ये एका ठिकाणी, बंगळुरूत 2 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. तामिळनाडूच्या त्रिचीत देखील 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.
छापा टाकण्यात आलेले ठिकाण हेही वाचा -Disha Salian Case : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन मंजूर
जेसस लाल यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी
मुंबईतील मालाडच्या दफ्तरी मार्गावर असलेल्या एका इमारतीमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपचे मुख्य कार्यालय आहे. युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपच्या कार्यालयावरच आयकर विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. युनिव्हर्सल एज्युकेशनचे सर्वेसर्वा जेसस लाल यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या छाप्यात आयकर विभागाच्या हाताला नमेके काय लागले, हे अद्याप समोर आलेले नाही. गेल्या तीन दिवसांपासून युनिव्हर्सल एज्युकेशनच्या कार्यालयांवर कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
टॅक्स चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले
दरम्यान दुसरीकडे युनिव्हर्सल एज्युकेशनच्या मुख्य कार्यालयासोबतच मुंबईतील अन्य बारा ठिकाणी देखील आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. तर, राज्यातील ठाणे, वसई, नाशिक, औरंगाबाद, मीरा भायदंरसह इतर अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. आयकर विभागाकडून अचानक धाडसत्र सुरू झाल्याने टॅक्स चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा -Sadabhau Khot : 'तुम्ही दरोडे टाकलेत, आतही तुम्हीच जाणार' - सदाभाऊ खोत यांचा इशारा