मुंबई - ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी आज केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
हलगर्जीपणाचा परिणाम निवडणुकीवर -
योगेश टिळेकर यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीपणाचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.
हे ही वाचा -राज्यातील महिला सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, नराधमांना वचक बसवा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश