मुंबई -राज्यातील मुस्लिम महिलांची ऑनलाइन बदनामी करणाऱ्या एका ॲपवर ( Offensive App ) कारवाई करून गंभीर दखल घ्यावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले ( State Women Commission ) आहेत. 'सुली डील' नावाच्या एका ऑनलाइन ॲपवर मुस्लिम महिलांचे फोटो प्रसारित करून त्यांच्यापुढे काही किंमत छापण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांची बदनामी करून राजकीय डाव ठेवून कुणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी दिला आहे.
महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनीही कारवाईच्या दिल्या होत्या सूचना
याबाबत राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून अशा महिलांची बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह ॲपवर ताबडतोब कारवाई करावी आणि संबंधितांवर सायबर गुन्हे अन्वेषण विभागामार्फत गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी दिले आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांनीही महिलांची ऑनलाइन बदनामी केली जात असल्याप्रकरणी नुकतीच सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेऊन त्यांना सक्त कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.