महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 1, 2020, 7:34 PM IST

ETV Bharat / city

राज्याच्या मुद्रांक शुल्क वसुलीत अखेर वाढ, तिजोरीत सुमारे 933 कोटींची भर

एप्रिलमध्ये घटलेल्या महसुलात जूनमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये सुमारे 819 कोटीचा महसूल राज्याला मिळाला आहे, तर जूनमध्ये 1 लाख 74 हजार 393 दस्त नोंदणी झाली होती.

मुद्रांक शुल्क वसुली
मुद्रांक शुल्क वसुली

मुंबई - महाराष्ट्राला मद्यविक्रीनंतर सर्वाधिक महसूल मुद्रांक शुल्क वसुलीतून मिळतो. महिन्याला दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा महसूल देणाऱ्या राज्याच्या या उत्पन्न स्रोतालाही कोरोना-लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच एप्रिलमध्ये सुमारे 3 कोटी 94 रुपये मुद्रांक शुल्क वसुली झाली होती. पण आता मात्र 'पुनश्च हरी ओम' म्हणत राज्यभरातील काही नोंदणी कार्यालये पूर्णवेळ सुरू झाल्याने मुद्रांक शुल्कही वाढू लागले असून महसूल वाढ होऊ लागली आहे. त्यामुळेच जुलैमध्ये मुद्रांक शुल्क वसुलीत चांगली वाढ झाली असून सुमारे 933 कोटीचा महसूल तिजोरीत जमा झाला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या सरकारसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल.

मुद्रांक शुल्क वसुलीची फेब्रुवारीमधील आकडेवारी लक्षात घेता, एप्रिलमध्ये महसुलात मोठी घसरण झाली. फेब्रुवारी 2020 मध्ये 2 लाख 68 हजार 346 दस्त नोंदणीद्वारे जिथे मुद्रांक शुल्क वसुलीतून राज्याला सुमारे 1 हजार 700 कोटी रुपये मिळाले होते, तिथे एप्रिलमध्ये 1 हजार 425 दस्त नोंदणीद्वारे केवळ सुमारे 3 कोटी 94 लाख रुपये महसूल मिळाला होता. हा राज्याच्या इतिहासातील सर्वात कमी महसूल ठरला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर जूनअखेरीस मुद्रांक शुल्क वसुलीत वाढ करण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून भर देण्यास सुरुवात केली. त्यानुसार मुंबईतील 10 विभागीय कार्यालयासह राज्यातील अन्य कार्यालये प्रत्यक्ष सुरू करण्यात आली. त्यानुसार ऑनलाइनबरोबरच प्रत्यक्ष मुद्रांक शुल्क-नोंदणी शुल्क भरून घेण्यासही सुरुवात झाली. अखेर आता हा प्रयोग यशस्वी ठरू लागला आहे. आर्थिक अडचणीत अडकलेल्या सरकारला दिलासा मिळत असून तिजोरीत भर पडू लागली आहे.

एप्रिलमध्ये घटलेल्या महसुलात जूनमध्ये वाढ झाली आहे. जूनमध्ये सुमारे 819 कोटीचा महसूल राज्याला मिळाला आहे, तर जूनमध्ये 1 लाख 74 हजार 393 दस्त नोंदणी झाली होती. जुलैमध्ये यात आणखी वाढ झाली आहे. जुलैमध्ये तब्बल 1 लाख 88 हजार 049 दस्त नोंदवले गेले आहेत. त्यानुसार सुमारे 933 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. लॉकडाऊननंतरच्या तीन महिन्यानंतर हा सर्वात अधिक महसूल आहे. तर यापुढे महसुलात आणखी वाढ होऊन नक्कीच पुन्हा दीड ते दोन हजार कोटीची वसुली होण्यास सुरुवात होईल, असे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

मुंबईत सुमारे 242 कोटीची वसुली

राज्याला मुद्रांक शुल्क वसुलीतून सर्वात अधिक महसूल मिळत असताना यातील सर्वाधिक हिस्सा मुंबईचा असतो. त्यानुसार जुलैमध्ये जिथे सुमारे 933 कोटीचा महसूल मिळाला आहे, त्यातील सुमारे 242 कोटीचा वाटा एकट्या मुंबईचा आहे. 21 हजार 311 दस्तनोंदणीतून हा महसूल मिळाला आहे. एप्रिलमध्ये जिथे राज्याला सुमारे 3 कोटी 94 हजार इतका कमी महसूल मुद्रांक शुल्क वसुलीतून मिळाला होता, तिथे यातील 43 हजार 547 रुपये महसूल मुंबईतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details