मुंबई - कोरोना-लॉकडाऊनमुळे देशभरातील बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. बांधकाम व्यवसाय मंदीच्या खाईत अडकला आहे. पण आता मात्र हळूहळू बांधकाम व्यवसाय सावरू लागला आहे. याचे उत्तम उदाहरण सप्टेंबरमधील मुद्रांक शुल्क आणि नोंदणीतून समोर आले आहे. सप्टेंबरच्या मुद्रांक शुल्क-नोंदणी वसुलीच्या आकडेवारीनुसार राज्यात 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आहेत. तर यातून 763 कोटींचा महसूल मिळाला आहे. यात मुंबईतील 5 हजार 597 घरांचा समावेश असून यातून 180 कोटीचा महसूल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कात कपात केल्याने मोठ्या प्रमाणात घर-खरेदी व्यवहाराला चालना मिळाल्याचे चित्र आहे.
विक्रीतून मुद्रांक शुल्क रूपाने मिळाला 763 कोटींचा महसूल
मुंबई, मुंबई महानगर प्रदेश हे घर खरेदी-विक्रीसाठी हॉटस्पॉट मानले जातात. त्यानुसार दर महिन्याला येथे मोठ्या संख्येने घर खरेदी-विक्री होते. तर राज्यातही घर खरेदी-विक्रीचा आलेख वाढता असतो. पण एप्रिलपासून कोरोना-लॉकडाऊनमुळे घर खरेदी-विक्रीला ब्रेक लागला आणि हे व्यवहार मंदावले. असे असले तरी, आता अनलॉकमध्ये बांधकाम व्यावसाय हळूहळू सावरू लागला आहे. खरेदी-विक्री व्यवहार वाढू लागले आहेत. नवीन प्रकल्प सुरू होऊ लागले आहेत. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुद्रांक शुल्क दरात राज्य सरकारने 2 ते 3 टक्क्यांनी कपात केली आहे. याचा ही चांगला परिणाम खरेदी-विक्री वाढण्यात होऊ लागला आहे. यातूनच सप्टेंबरमध्ये घरविक्रीत मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात एकूण 1 लाख 19 हजार 834 घरे विकली गेली आहेत. यातून सरकारला 763 कोटींचा महसुल मुद्रांक शुल्क-नोंदणी रूपाने मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मुद्रांक शुल्क दरात 2 ते 3 टक्क्यांची कपात केली असताना हा महसूल मिळाला आहे. अन्यथा हा महसूल किमान दीड हजार कोटीच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा -महारेराचा ग्राहकाला दणका, घराची रक्कम भरण्यास विलंब केल्याने व्याज भरण्याचे आदेश
लॉकडाऊन फटका, घर खरेदी-विक्री व्यवसायात मंदी