मुंबई -मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याचदरम्यान सरकारकडून माराठा समाजाला ईबीसीमधून आरक्षण देण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिली.
ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण द्या
मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने काढून घेतले आहे. सुप्रीम कोर्टात योग्य प्रकारे बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे बाजू मांडावी अशी मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. याच दरम्यान मराठा समाजाला इसीबी म्हणजेच आर्थिक मागासवर्ग म्हणून आरक्षण देण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. नुकतीच मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रकार परिषद घेऊन आम्हाला मागासवर्ग आयोगाने ओबीसी असल्याचे मानले आहे, त्यानुसार आम्हाला आरक्षण देण्यात आले होते. हे आरक्षण विधानभवन आणि उच्च न्यायालयात टिकले होते. यासाठी आम्हाला ओबीसीच्या कोट्यातूनच आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली होती. यामागणीला अनुसरून राज्यव्यापी बैठक घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते.