मुंबई - राज्यातील समीकरणे गेल्यावर्षी बदलली. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. एकाच वर्षात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यातच आता राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला एक अहवाल दिला आहे. आगामी स्थानिक निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे म्हटले आहे. यामुळे येत्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सरकारचा विश्वास दुणावला आहे.
एकत्र लढण्याची मागणी
मुंबई महापालिकेपासून दिल्लीपर्यंत शिवसेना आणि भाजपाची युती होती. मागील वर्षी ही युती तुटली. शिवसेनेने गेले २५ वर्ष मित्र असलेल्या भाजपाने दिलेले मुख्यमंत्रीपदाचे वचन पळाले नाही, म्हणून युती तोडण्याचा निर्णय घेतला. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घेऊन सरकार स्थापन केले. राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाले. या सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. एका वर्षातच विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. यात ६ पैकी ४ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढवल्यास भाजपाला सत्तेबाहेर ठेवता येऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. यामुळे आघाडीतील तीनही पक्षांचे नेते आगामी निवडणुका एकत्र येऊन लढवण्याची मागणी करत आहेत.
पोषक वातावरण
राज्यात जानेवारी महिन्यात १४ हजार २३२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. राज्यातील नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या पाच महापालिका आणि तब्बल ९६ नगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात लागण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्व ताकदीनिशी सामोरे जाईल, असे म्हटले होते. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जुळवून घ्या, असे आदेश राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. याच दरम्यान राज्याच्या गुप्तचर विभागाने सरकारला एका अहवाल दिला आहे. या अहवालानुसार आगामी स्थानिक निवडणुका महाविकास आघडी म्हणून एकत्र लढवण्यासाठी पोषक वातावरण असल्याचा म्हटले आहे.
निवडणुका होणाररंगतदार
आगामी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकासआघाडीने विधानपरिषद निवडणुकीतील कामागिरीची पुनरावृत्ती करायचे ठरवले आहे. भाजपाने विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर राज ठाकरे यांनीही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण सामर्थ्याने लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे.