मुंबई -पुण्यात मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा आम्ही निषेध करत असून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. विरोधी पक्ष राज्यात मुली सुरक्षित नाहीत, असे बोलून राजकारण करत आहेत. मात्र, आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे, हे पहावे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
'जो कुणी कुकर्म करेल, त्याला सोडणार नाही' -
जे भाजपा राज्य सरकारवर आरोप लावत आहेत, त्यांच्या खासदार, आमदारांनी व नेत्यांनी केलेले कुकर्म आठवावे. सेंगर, उन्नाव सारख्या व उत्तरप्रदेशमध्ये अशा अनेक घटना त्याकडे लक्ष द्यावे आणि मग अशाप्रकारचे आरोप करावे, असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे जो कुणी कुकर्म करेल, त्याला सोडण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. दरम्यान, संबंधित ११ लोकांना अटक झाली असून त्यांच्यावर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.