मुंबई - पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकार अॅक्शनमोड आले आहे. नालेसफाई, पूरजन्य स्थिती, रस्त्यांवरील खड्डे, होर्डिंगची तपासणी, साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा. तसेच मान्सून पूर्व कामांची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आढावा घ्या. केवळ कार्यालयात बसून राहू नका, अशा शब्दांत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त, नगर पालिका, नगर पंचायतींच्या प्रशासनाला चांगलेच खडसावले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी नियंत्रण कक्ष, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. लोकसहभाग वाढवा. आपत्कालीन स्थितीत तोंड आवश्यक साधन सामुग्री, उपकरणांची खरेदी करा, अशा सूचना मंत्री शिंदे यांनी दिल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका- नगरपंचायतींनी केलेल्या तयारीचा आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन निर्देश दिले आहेत. शहरांमधील नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाची सज्जता, धोकादायक इमारती, वृक्षछाटणी आदी विषयांवर महानगरपालिका, नगरपालिकांनी तातडीने कार्यवाही करावी, त्यासाठी विविध विभागांशी समन्वय राखण्याच्या सूचना नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
नालेसफाईवर विशेष लक्ष द्या -शहरांमधील नाल्यांची १०० टक्के सफाई होईल, याकडे विशेष लक्ष द्या. नालेसफाई झालेल्या भागातील गाळ, कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना नगर विकास मंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना करा. रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी तात्काळ भरा, असे निर्देश मंत्री शिंदे यांनी दिले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी पूर्वतयारी करुन ठेवा. तसेच शहरातील मोठे होर्डिंग्ज पडून दुर्घटना घडणार नाहीत, यासाठी होर्डिंग्जची तपासणी करण्याच्या सूचनाही नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिल्या.