मेट्रो तूर्तास तरी कारशेडमध्येच; अनलॉक 4 मध्ये एमएमओपीएला दिलासा नाही - अपडेट मेट्रो न्यूज
मेट्रोतून रोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. कोरोनाच्या काळात सर्वांनाच रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी नाही. त्यामुळे अनेकांना अंधेरी-घाटकोपर प्रवास करण्यासाठी टॅक्सी-रिक्षाचा पर्याय निवडावा लागत असून तो महागडा ठरत आहे.
मुंबई - अनलॉक 4 मध्ये देशातील मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला. त्यानंतर मुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही सेवेत असलेली एकमेव मेट्रो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, असे म्हणत मुंबईकर मेट्रो प्रवाशी खुश होते. पण प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारने अनलॉक 4 मध्ये मेट्रो सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मेट्रो प्रवाशांची निराशाच झाली आहे. आता आणखी काही काळ मेट्रो गाड्या ट्रॅकवर येण्याऐवजी कारशेडमध्येच असणार आहेत.
22 मार्चपासून मेट्रो 1 बंद आहे. 11.5 किमीचा हा जरी छोटा मार्ग असला तरीही मुंबईकरांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळतो, मेट्रोतून रोज साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. कोरोनाच्या काळात सर्वांनाच रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी नाही. त्यामुळे अनेकांना अंधेरी-घाटकोपर प्रवास करण्यासाठी टॅक्सी-रिक्षाचा पर्याय निवडावा लागत असून तो महागडा ठरत आहे. तेव्हा मेट्रो 1 कधी सुरू होते याकडे मेट्रो प्रवाशांचे डोळे लागले होते. तर अनलॉक 4 मध्ये मेट्रो सुरू होईल या आशेवर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ही होते. मेट्रो 1 सुरू करण्यासाठी एमएमओपीएल सज्ज ही होते. पण आज राज्य सरकारने मेट्रोला परवानगी नाकारल्याने एमएमओपीएल ही नाराज झाले आहे. कारण 5 महिन्याहुन अधिक काळ मेट्रो बंद असून त्यामुळे एमएमओपीएलला मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आता हे नुकसान आणखी वाढत जाणार असल्याने आता एमएमओपीएलची चिंता ही वाढणार असल्याची चर्चा आहे.
मोनोचा विसर?
अनलॉक 4 मध्ये मेट्रो सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मेट्रो आणखी काही काळ कारशेडमधेच राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. पण त्याचवेळी अनेकांना प्रश्न पडला आहे की मोनोचे काय?कारण अनलॉक 4 च्या आजच्या नियमावलीत मेट्रोचा स्पष्ट उल्लेख आहे. पण मोनोचा उल्लेखच नाही. देशातील एकमेव मोनो मार्ग-मोनो प्रकल्प मुंबईत आहे. पण याचचेंबूर-वडाळा-जेकब सर्कल मोनोचा उल्लेख नाही. असे असले तरी मेट्रो बंद राहणार असल्याने साहजिकच मोनोही बंद राहणार आहे. दरम्यान याविषयी एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही.