मुंबई -उत्तराखंडला निघालेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्य सरकारने विमान प्रवास नाकारल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे सरकाराकडून याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद सुरू आहेत. राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीलाही राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. सरकारमध्ये यावरून धुसफूस सुरू असतानाच आता विमानप्रवास नाकारल्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
पुन्हा वाद होण्याची शक्यता -
उत्तराखंडला हिमकडा कोसळून आलेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी निघाले होते. माजी मुख्यमंत्री म्हणून ते उत्तराखंडला निघाले होते. त्याकरिता ते सकाळी विमानात बसले. मात्र, राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधण्यात आला. परंतु, कोणतेही उत्तर न मिळाल्याने राज्यपालांना विमानातून उतरुन परत माघारी राजभवनावर परतावे लागले. त्यामुळे आता सरकार आणि राज्यपालांमध्ये शीतयुद्ध रंगणार आहे.
खासगी विमानाने रवाना -
राज्य सरकारने विमान नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले आहे. ते येथे हिमकडा दुर्घटनास्थळाला भेट देणार आहे. राज्यपाल हे दुपारी दोन वाजेपर्यंत डेहरादूनला पोहोचणार आहे.
राज्य सरकारला दिली होती पूर्वकल्पना -
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उत्तराखंड दौऱ्याची राज्य सरकारला पूर्वकल्पना दिली होती. तरीही राज्य सरकारने राज्यपालांना विमान प्रवास नाकारल्यानंतर राजभवनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राज्य सरकारला राज्यपालांच्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना दिली होती, असे त्यांनी म्हटले आहे. देहराडूनमधील मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे आयएएस अधिकाऱ्यांच्या १२२ व्या प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भूषवणार आहेत. शुक्रवारी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. या नियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी ११ फेब्रुवारीरोजी सकाळी १० वाजता रवाना होणार होते. या संदर्भात राज्यपालांच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे सरकारी विमान प्रवासाला परवानगी मिळावी, याकरिता २ फेब्रुवारीरोजी पत्रव्यवहार केला होता. पत्रानुसार राज्यपालांनी गुरुवारी विमानतळ गाठले. मात्र, सरकारी विमान प्रवासास परवानगीच नसल्याची बाब समोर आली.
याबाबत मला याबद्दल माहिती नाही - अजित पवार
राज्यपालांच्या या प्रवासाला राज्य सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आल्यानंतर विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावे लागले. आता ते खाजगी विमानाने उत्तराखंडला जाणार आहे. या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी माझ्या कामात व्यस्त असल्याने मला याबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांना विमानातून उतरवणे दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
राज्यपालांना विमानातून उतरवणे दुर्दैवी असून असा प्रकार महाराष्ट्रात कधी घडलेला नाही. राज्यपाल हा व्यक्ती नाही, तर हे पद आहे. व्यक्ती येतात जातात. खर म्हणजे राज्यपाल हेच राज्याचे प्रमुख असतात. या प्रकरणात जाणीवपूर्वक राज्यपालांना विमानात बसेपर्यत परवानगी दिली नाही. त्यामुळे राज्यपालांना विमानात बसल्यानंतर उतरावे लागले. हा पोरखेळ आहे, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या प्रकारामुळे राज्याची प्रतिमा मलिन झाल्याचेही त्यांनी म्हटले.
जनता सरकारचा घमंड उतरवेल - आशिष शेलार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानाने प्रवास करायला महाविकास आघाडी सरकारने परवानगी नाकारल्याने विमानात बसलेल्या राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाआघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यपालांना सरकारने विमानातून उतरवले, महाराष्ट्रातील जनता महाआघाडी सरकारचा घमंड उतरवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
हा सूड भावनेचा अतिरेक - प्रवीण दरेकर