मुंबई - शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित ( Tukaram Supe suspended ) करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
हेही वाचा -Omicron in Maharashtra : आज ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही
काय म्हटले आहे आदेशात?
हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खासगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरतील आणि तदनुसार कारवाईस पात्र ठरतील, असे आदेशात म्हटले आहे.
फौजदारी गुन्हा दाखल
सन २०१९ - २० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) केलेल्या गैरव्यवहाराबाबत सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना १६ डिसेंबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. सुपे यांना अटक केल्याच्या दिनांकापासून ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
चौकशी अहवाल १५ दिवसांत सादर करा
टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती गठीत केली आहे. ही समिती शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली असून चौकशी अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. याबाबत आज शालेय शिक्षण विभागाने शासन आदेशसुद्धा काढला आहे.
सुपे यांच्या घरावर पुणे पोलिसांचा छापा, 2 कोटी रुपये कॅश मिळाले
टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी (TET Exam Scam) अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या घरात आज पुणे पोलिसांनी छापा (Raid on Tukaram Supe House) टाकला. या कारवाईत 2 कोटी रुपयांची कॅश आणि काही सोने मिळाले आहे. याआधी तुकाराम सुपे यांच्याकडून पुणे पोलिसांनी 88 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने हस्तगत केले होते.
तपासात 2 कोटींहून अधिक रक्कम आणि सोने मिळाले
टीईटी ( TET ) परीक्षा घोटाळा (TET Exam Scam ) प्रकरणातील दुसऱ्या धाडीत तुकाराम सुपे यांच्या घरी आणखी पैशांचे घबाड पोलिसांच्या हाती (Raid on Tukaram Supe House ) लागले आहे. तपासात घरातून दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने हस्तगत करण्यात आले आहे. सुपे यांच्या घरी पोलीस धाड टाकायच्या आधीच पत्नी आणि मेहुण्याने रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोने तपासात मिळाले.
सुपे यांना 17 डिसेंबरला अटक करण्यात आली होती
शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका असलेले राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पोलिसांनी अटक केली होती. टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात सुपे यानी पेपर फुटीला मदत केल्याचे समोर आले होते. त्यांचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -BJP vs Shivsena : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पुन्हा भाजपच्या निशाण्यावर