मुंबई - सोमवार 5 जुलै आणि मंगळवार 6 जुलै या दोन राज्याचे पावसाळी अधिवेशन असणार आहे. त्यापूर्वी रविवारी (आज) सायंकाळी राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक झाली. दरम्यान, बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार होती, अधिवेशनात मांडले जाणारे ठराव तसेच महत्त्वाच्या विधेयकाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार होती. मात्र ती टाळण्यात आली आहे. तसेच चहापानाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. त्यामुळे या बैठकीत विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत तसेच केंद्रीय कृषी कायद्याविरोधात काय ठराव केला, हे समजू शकले नाही.
हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आघाडी सरकारच्या बैठका, तर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची तयारी
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत निर्णय
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विधानसभा अध्यक्षपद तातडीने भरावे, अशा सूचना केल्या होत्या. या पत्राला उत्तर देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सर्व आमदारांच्या rt-pcr टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यानंतर आमदारांची संख्या पाहता विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आमदारांच्या rt-pcr टेस्ट झाल्यामुळे मंत्रीमंडळ बैठक अध्यक्ष निवडणुकीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा -विधानसभा अध्यक्ष येत्या अधिवेशनात निवडला जाणार, तर अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार - बाळासाहेब थोरात
केंद्रीय कृषी कायद्याविरोधात बैठकीत ठराव
मंत्रीमंडळ बैठक पार पडल्यानंतर अधिवेशनात होणाऱ्या कार्यक्रमाची कोणतीही माहिती पत्रकारांना न सांगतात मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळातील इतर मंत्री निघून गेले.