महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूरबाधित शाळांमधील शिक्षण पूर्ववत करा; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश - flood effect on schools

राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड , ठाणे, पालघर, पुणे अशा नऊ जिल्ह्यातील एकुण 456 शाळा या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाल्या असल्याचे प्राथमिक पाहणीतून आढळून आले आहे.

Varsha Gaikwad
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

By

Published : Jul 29, 2021, 3:00 AM IST

मुंबई - अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थ‍ितीमुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली. शाळांच्या दुरुस्तीचे नियोजन करून तेथे लवकरात लवकर शिक्षण सुरू करण्याचे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले. बैठकीत उपस्थित शालेय शिक्षण अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या नुकसानासंबंधी माहिती दिली.

हेही वाचा -राज्यात पुरामुळे 213 जणांचा मृत्यू, तर 8 जण अद्यापही बेपत्ता

ज्या ठिकाणी पाठ्यपुस्तकांचे नुकसान झालेले आहे, त्या ठिकाणी नव्याने पाठ्यपुस्तके पुरविण्याचे निर्देश मंत्री गायकवाड यांनी दिले. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी नियोजन करून ऑफलाईन, ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करावी. नुकसान झालेल्या शालेय पोषण आहारातील तांदूळ व धान्य आदी वस्तुंचा पुरवठा पुन्हा करण्यात यावा. पूरस्थितीमुळे उद्‍भवणा-या आजारांचा विचार करून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आणि पुरामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पर्यायी वसतीगृहाच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही मंत्री गायकवाड यांनी यावेळी दिल्या.

  • साडेचारशे शाळांचे नुकसान-

राज्यातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, रायगड , ठाणे, पालघर, पुणे अशा नऊ जिल्ह्यातील एकुण 456 शाळा या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झाल्या असल्याचे प्राथमिक पाहणीतून आढळून आले आहे. यात काही ठिकाणी वर्गखोल्यांचे तसेच वर्गखोल्यांच्या संरक्षण भिंती, छप्पर यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके पाण्यात वाहून गेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा व गगनबावडा या दोन तालुक्यातील शाळांमधील शालेय पोषण आहारांतर्गत प्राप्त तांदुळ व धान्याचे नुकसान झाले आहे. या सर्व शाळांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अंदाजे 28 कोटी 20 लाख 76 हजार रुपयांपर्यंतची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.

  • विद्यार्थ्यांना पुस्तिका उपलब्ध-

पूर परिस्थ‍ितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमातून शिक्षण पोहचविण्याचा प्रयत्न प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील 38 शाळा पुरामुळे बाधित झाल्या. हा भाग डोंगराळ असल्याने इथे ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधेत अडचण येत होती. या परिस्थ‍ितीत महाबळेश्वर पंचायत समितीमार्फत ‘माझी दैनंदिनी’ या उपक्रमांतर्गत स्वयं अध्ययनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तिका उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • 'टिव्हीवरील शाळा' हा उपक्रम-

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथील स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवरून 'टिव्ही वरील शाळा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात स्थानिक शिक्षक विद्यार्थ्यांना टिव्हीवरून अभ्यासक्रम शिकवित आहेत. रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण भागातील तळीये, सह्याद्रीवाडी येथे शाळेसोबत संपूर्ण गावाचेच पुनर्वसन करावे लागणार आहे. या भागात ऑफलाईन शिक्षणाबरोबरच हॅम रेडीयोच्या माध्यमातून शिक्षण देण्याची सुरुवात येत्या 10 ऑगस्टपासून प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे.

हेही वाचा -रश्मी शुक्ला यांचा गौप्यस्फोट! फोन टॅपिंग सरकारच्या परवानगीने केल्याचा न्यायालयात दावा

ABOUT THE AUTHOR

...view details