मुंबई -एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेनेही या संपात भाग घेतला. राज्यात आज (सोमवारी) दिवसभरात २५० आगारांपैकी २४० आगार बंद ठेवत संपाला बिनशर्त पाठिंबा दिला. प्रवाशांना याचा फटका बसला असून प्रंचड यातना सोसव्या लागल्या. खासगी वाहतूकदारांनी मात्र यात चांगलेच हात धूऊन घेतले.
राज्यातील २४० आगार बंद -
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ताची मागणी मान्य झाल्याने कृती समितीने २८ऑक्टोबर रात्रीपासून उपाेषण मागे घेतले. परंतु विलीनीकरणाच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांंनी संप सुरुच ठेवला आहे. कृती समितीतील २३ कामगार संघटनांनी विलीनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला असला तरी २२ संघटना संपात सहभागी झाल्या नाहीत. संघर्ष एसटी कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारण्याची नोटीस दिली. संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात बुधावरी आव्हान दिले. या याचिकेवर गुरुवारी रात्री सुनावणी झाली असता संघटनांनी संप मागे घेण्याचे निर्देश न्यायालयाने कामगार संघटनाला दिले आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत संप सुरुच ठेवला आहे. या संपला आज १२ दिवसपूर्ण झाले असून कर्मचाऱ्यांनी स्वतःहून राज्यातील २५० आगारांपैकी २४० आगार बंद ठेवत संपाला बिनशर्त पाठिंबा दिला.