मुंबई - मागील तीन महिन्यापासून संपावर ठाम ( ST Workers Strike ) असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ( MSRTC ) गेल्या दीड महिन्यापासून कारवाईचे सत्र सुरुच ठेवले आहे. आज (दि. २ फेब्रुवारी) महामंडळाने १८९ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ७ हजार २५२ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ८ हजार ३७३ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहे.
११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई -एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संपामुळे ( ST Workers Strike ) सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने ( MSRTC ) कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करुनही कर्मचारी आंदोलन मागे घेत नाहीत. या संपावर तोडगा निघावा, यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन केले. मात्र, तरीही कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची ( MSRTC ) कारवाई जोरदार सुरू आहे. आज (दि. २ फेब्रुवारी) १८९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या ७ हजार २५२ झाली आहे. आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ३७३ झाली आहे.