मुंबई - उच्च न्यायालयाच्या ( Mumbai High Court ) निर्देशानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. 82 हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी 46 हजार 662 कर्मचारी कामावर हजर झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटी सेवा लवकरच पूर्ववत होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लालपरी पुन्हा धावत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला ( Maharashtra ST Worker Resume ) आहे.
22 एप्रिलपर्यत रुजू होण्याचे निर्देश - एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासह विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापासून संप पुकारला ( ST Worker Strike ) होता. तसेच, संपकरी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू होण्याच निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत संपकरी कर्मचारी कामावर हजर झाल्यास निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.