मुंबई- उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ९६ टक्केहुन अधिक एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रस्त्यांवर एसटी पुन्हा धावू लागली आहे. सध्या एसटीची प्रवासी संख्या २२ लाखांवर गेली आहे. यातून महामंडळाच्या तिजाेरीत प्रतिदिवस सरासरी १३ काेटींचा महसूल जमा झाला आहे. गेल्या महिन्यात प्रथमच एसटी महामंडळाने २६९ कोटी ५९ लाख ४४ हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
83 हजार एसटी कर्मचारी हजर -एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांपासून संप पुकारला होता. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत मोठा प्रमाणात संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत महामंडळात 83 हजार कर्मचारी हजर झाले आहेत. हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महामंडळाने राज्यातील एसटीची वाहतुक सुरु केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला माेठा दिलासा मिळाला आहे.
प्रवासी संख्या २२ लाखपर्यंत-कोरोना पूर्वकाळात एसटी महामंडळाच्या बसेसमधून दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करत होते. एसटी महामंडळाला प्रवासी वाहतूक येथून प्रत्येक दिवशी २१ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. कर्मचार्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशतः सुरू असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मात्र आता न्यायालयाच्या निर्देशानंतर कर्मचारी कामावर हजर झाले आहे. राज्यभरात १२ हजार ५८६ एसटी मार्फत ३१ हजार ५०० पेक्षा जास्त एसटी फेऱ्या सुरू असून प्रवासी संख्या २२ लाखपर्यंत पोहोचली आहे. त्यातून एसटी महामंडळाला दररोज सरासरी १३ कोटी रुपयांचे महसूल मिळत आहे.