महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एसटी महामंडळ लवकरच सुरू करणार पेट्रोल पंप - अनिल परब

उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे. एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि 5 ठिकाणी एलएनजी पंप सुरु करण्यात येणार आहे.

mumbai
परिवहन मंत्र्यांची भेट घेताना पदाधिकारी

By

Published : Aug 18, 2020, 7:42 PM IST

मुंबई - प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करत आहे. उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. त्यासाठीचा सामंजस्य करार परिवहन मंत्री, अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात करण्यात आला.

या सामंजस्य करारानुसार भविष्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल-डिझेलपंप आणि 5 ठिकाणी एलएनजी पंप सुरु करण्यात येणार आहे. सदर पेट्रोल-डिझेलपंप, एलएनजी पंप इंडियन ऑईलकडून बांधण्यात येणार असून त्याचे संचालन एसटी महामंडळाकडून करण्यात येणार आहे.


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेल्या प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या हजारो कोटीच्या उत्पन्नाला एसटीला मुकावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये एसटीने पर्यायी उत्पन्नाचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मालवाहतुकीसारख्या उपक्रमाला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच टायर पुनर्स्थिरीकरण प्रकल्पातून देखील व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक उत्पन्न स्त्रोतांबरोबरच राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या एसटीच्या मोकळ्या जागेवर इंडियन ऑईलच्या सहकार्याने सर्वसामांन्यांसाठी पेट्रोल-डिझेल, एलएनजी पंप उभारले जाणार आहेत. या विक्रीतून एसटी महामंडळाला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण होईल, असे मत यावेळी परब यांनी व्यक्त केले.


या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने व एसटीच्या वरिष्ठ अधिकऱ्यांसह इंडियन ऑईलचे महाराष्ट्र प्रमुख अमिताभ अखवैरी, महाव्यवस्थापक राजेश जाधव यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details