मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर अशा अनेक मुद्यावर एसटी कामगार संयुक्त कृती समितीने बुधवारपासून बेमुदत उपाेषण पुकारले. परंतु पहिल्या दिवशी कृती समितीचा नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी भेट घेतली. परंतु काेणतेही स्पष्ट आश्वासन न मिळाल्याने उपाेषण सुरुच राहणार आहे.
कर्मचाऱ्यांची उपोषणाकडे पाठ -
कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी द्यावे. तसेच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागण्यांसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाशी संलग्न असलेल्या अनुक्रमे एसटी कामगार सेना, एसटी वर्कर्स काँग्रेस आणि मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने आझाद मैदान येथे बुधवारी उपोषण केले. यावेळी संघटनांनी केलेल्या बॅनरबाजीमधून एसटी विलिनीकरणाचा प्रमुख मुद्दाच वगळण्यात आल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. उपोषणाच्या ठिकाणी संघटनेचे ठराविक पदाधिकारी उपस्थित असल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
हे ही वाचा -पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन किरण गोसावी पसार.. महिला सहकाऱ्याला अटक
काय आहे मागणी -
* १ एप्रिल, २०१६ पासून शासनप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात यावा.
* वार्षिक वेतनवाढीचा दर ३% प्रमाणे देण्यात यावा.
* घरभाडे भत्ता ८, १६, २४ % प्रमाणे देण्यात यावे.
* शासनाप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर देऊन थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी.