मुंबई- विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. मतदारसंघात कोण बाजी मारणार? कोणाला मात मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातून काही विद्यमान मंत्र्यांना ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. तर, काही ज्येष्ठ नेत्यांनाही निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
हेही वाचा - 'टेंडरसाठी बायको विकणारी औलाद' राजेंद्र राऊतांची जीभ घसरली
पंकजा मुंडे
सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून पंकजा मुंडे काम करत आहेत. त्या परळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर या मतदारसंघात विरोधी पक्षनेते आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. येथे जोरदार लढत होत आहे. त्यात पंकजा मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार अशी चिन्हे आहेत.
राम शिंदे
जलसंधारण मंत्री म्हणून राम शिंदे हे सरकारमध्ये जबाबदारी सांभाळत आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघात ते प्रतिनिधीत्व करतात. यावेळीही ते या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते सलग दोनवेळा निवडून आले आहेत. मात्र, विजयाची हॅट्ट्रिक त्यांना सोपी नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी त्यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले आहे. पवार यांनी मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे शिंदे यांना हॅट्ट्रिक साधणे अवघड जाईल अशी चर्चा मतदारसंघात आहे.
आशिष शेलार
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आशिष शेलार निवडणूक लढत आहेत. शेवटच्या टप्प्यात त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला. मात्र, यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. त्यांच्या समोर काँग्रेस उमेदवार असिफ झकेरीया यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. मुस्लीम मतदार या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावतात. या आधीही या मतदारसंघातून बाबा सिद्धीकी यांनी बाजी मारली आहे. त्याची पुनर्रावृत्ती झकेरीयांकडून होण्याची शक्यता आहे.