मुंबई - एकीकडे टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक सामान्य नागरिकांसाठी बंद आहे. मात्र, इंधन दरवाढीचा वेग कायम असल्याने सामान्य नागरिक दुहेरी संकटात सापडला आहे. यातच शहरात सार्वजनिक वाहतूक सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्वांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यातच इंधन वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला देखील ग्रहण लागलंय. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मागील महिनाभरापासून वाढ होतं आहे. सध्या मुंबईत सार्वजनिक वाहनांची सुविधा देखील नाही. अनलॉक - १.० सुरू झाल्यापासून सरकारी आणि काही खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, त्या तुलनेत प्रवासी वाहतूक वाढवण्यात आलेली नाही. याचा त्रास मुंबईकरांना सोसावा लागतोय. परिवहन बसेसची संख्यादेखील कमी असल्याने चाकरमान्यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे ते मेटाकुटीला आले आहेत. सध्या कोणताही पर्याय नसल्याने वाढीव दर सहन करण्याव्यतिरिक्त पर्याय नसल्याचे मुंबईकर सांगत आहेत.
संचारबंदीतील नियामांच्या शिथिलीकरणानंतर मुंबईरांसाठी प्रवास तापदायक झाला आहे. बेस्ट सेवा केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहेत. अपुऱ्या सुविधेमुळे मुंबईत विविध बसथांब्यांवर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळते. त्यातच रिक्षा आणि टॅक्सीत बसणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर निर्बंध आलेत. चारऐवजी केवळ दोनच प्रवासी टॅक्सीत बसू शकतात. त्याचबरोबर पोलिसांच्या बंदोबस्तात सामन्यांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी तपासणी नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात.