मुंबई -राज्यसभेच्या निवडणुकीतून संभाजी राजे यांनी माघार घेताच, मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. राज्यभरात शिवसेनेच्या विरोधात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, शाहू महाराजांनी संभाजी राजेंचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इशाऱ्यावर घेतल्याचे खबळबजनक विधान केले. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजानेही नरमाईची भूमिका घेतली आहे. ही बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला फायदेशीर ठरणार आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणार निवडणूक -राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीत संभाजी राजेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता. सर्व आमदारांना पत्र लिहून सहकार्याचे आवाहन केले. परंतु, आघाडी सरकारमधील संख्याबळानुसार शिवसेनेने दोन उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. संभाजी राजेंना सेनेकडून राज्यसभेवर जाण्याची ऑफर देण्यात आली. संभाजी राजेंनी ती फेटाळून लावत, अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. अखेर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले. मतांचे गणित न जुळल्याने संभाजी राजेंनी निवडणुकीतून माघार घेतली. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, अशी खंत व्यक्त केली. मराठा समाज शिवसेनेच्या विरोधात संतप्त झाला होता. मात्र, संभाजी राजेंचे वडील शाहू महाराज छत्रपतींनी या सर्व राजकीय खेळी मागे देवेंद्र फडणवीस आणि भाजप हेच असल्याचे ठणकावले. तसेच संभाजी राजेंनी आजवर घेतलेल्या राजकीय भूमिका वैयक्तिक होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर वडिलांनीच भाष्य केल्याने संभाजी राजेंची आता कोंडी झाली आहे. शिवाय, शिवसेनेच्या विरोधात उभा ठाकलेल्या मराठा समाजानेही मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.