मुंबई - राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेला वाद शिवसेनेच्या अस्तित्वापर्यंत पोहोचला आहे. शिवसेना संपली, अशी विधाने अलिकडच्या काळात वाढली आहेत. शिवसेनेवर चौफेर टीका होत असली, तरी शिवसेनेविषयी राज्यातील नागरिकांमध्ये सहानुभूती निर्माण होत आहे. हिच विरोधकांची डोकेदुखी ठरल्याचे दिसून येत आहे.
विरोधकांची शिवसेनेवर टीका, शिवसेना नेत्यांचे जोरदार प्रत्युत्तर -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकून सत्ता स्थापन केली. मुंबई मनपात २५ वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेला डावलल्याने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करत भाजपला आस्मान दाखवले. सत्ता हातातून गेल्याची सल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत शिवसेना गेल्याने सेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपकडून सातत्याने नावे ठेवली जात आहेत. तर खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना संपल्याचे विधान करत शिवसेनेला डिवचले आहे. मात्र, शिवसेनेला संपवणारेच संपले, असे प्रत्युत्तर शिवसेना आमदार तथा प्रवक्ता मनिषा कायंदे यांनी दिले. तर शिवसेनेला संपवणारा अजून पैदा झालेला नाही, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राणाच नाही तर अमित शाह यांच्यासह आजवर अनेकांनी 'शिवसेना संपेल' असे भाकित केले. पण शिवसेना संपण्याऐवजी अशा वक्तव्यामुळे शिवसेनेला सहानुभूती मिळत आहे.
अमित शाह यांना गाठावी लागली मातोश्री -देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेला दूर लोटण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने झाला. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रात भाजपाची सत्ता स्थापन झाली आणि भाजपला मोठे बळ मिळाले. त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला. मोठा भाऊ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शिवसेनेला झुकते माप न देता, भाजपने शिवसेनेवर वर्चस्व निर्माण केले. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदावर भाजपने दावा केला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटला. त्यानंतर दोन्ही पक्ष निवडणूक स्वतंत्र लढले. शिवसेनेचे मताधिक्य वाढले. सत्ता स्थापनेसाठी मातोश्रीवर न जाण्याची घोषणा करणाऱ्या भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांना सत्ता स्थापनेसाठीच मातोश्री गाठावी लागली.
किरीट सोमय्यांना गमवावी लागली खासदारकी -माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले. सन २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सोमय्या शिवसेनेला सातत्याने टार्गेट करत होते. शिवसैनिकांनी यावेळी संतप्त होऊन सोमय्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेतली. या वादात सोमय्यांना ईशान्य मुंबईत खासदारकीला मुकावे लागले. त्याठिकाणी भाजपचे नगरसेवक मनोज कोटक यांना संधी मिळाली. हा राग सोमय्या आजही काढत असल्याचे बोलले जाते.
नारायण राणेंवरही शिवसैनिकांचा रोष -नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली होती. लागोपाठ झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी त्यांचे उट्टे काढले. दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या वांद्रे पुर्व विधानसभा मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी राणे यांचा पराभव केला. त्यानंतर सातत्याने नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शिवाय, भाजपमध्ये प्रवेशाचा मार्ग देखील तब्बल पाच वर्षे रखडत ठेवला. अखेर शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर राणे हे भाजपमध्ये प्रवेश करत अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
खंडाळा घाटाच्यावर शिवसेना दिसणार नाही -१९७५ मध्ये काँग्रेसचे नेते रजनी पटेल आणि ९० च्या दशकात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल तर पुण्यात काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी खंडाळा घाटाच्यावर शिवसेना दिसणार नाही, असे विधान केले होते. २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पुढील काही वर्षात शिवसेना संपलेली असेल, असे म्हटले होते. मात्र प्रत्येकवेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनिशी जोमाने पुढे आल्याचे दिसून आले.
मनसेला अगोदर सुगीचे दिवस, मग लागली उतरती कळा -राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर मनसेची स्थापना केली. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना सुरुवातीला सहानुभूती मिळाली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाचे १२ आमदार आणि मुंबई मनपा २८ नगरसेवक निवडणूक आले. राज्यभरात मनसेला त्यावेळी सुगीचे दिवस होते. मात्र राज यांनी सातत्याने शिवसेना विरोधात उमेदवार देण्याची भूमिका घेत, इतर राजकीय पक्षांचे हित साधण्याचा प्रयत्न केला. राज यांना त्याचा फटका नंतरच्या निवडणुकीत बसू लागला. आज मनसेचा केवळ एक आमदार आणि एक नगरसेवक आहे. उर्वरित नेत्यांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. मनसेला अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडावे लागत आहे. सध्या भाजपशी सलगी करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला असून मनसे शिवसेनेला आव्हान देत आहे. मनसेला याचा फायदा आगामी काळात किती होईल, हे येत्या निवडणुकीनंतर समोर येईल.