महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shiv Sena And NCP Claim On Next Cm Post: आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा दावे-प्रतिदाव्यावरून संभ्रम, आमदार गोंधळले - संजय राऊतांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंचा पलटवार

पुढील पंचवीस वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असा प्रतिदावा केला आहे. शिवसेना-राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेल्या दाव्यावरुन महाविकास आघाडीतील आमदार मात्र गोंधळले आहेत. त्याचा फटका राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

Shiv Sena And NCP Claim On Next Chief Minister
शरद पवार आणि उद्धव ठाकरे

By

Published : Jun 2, 2022, 8:17 AM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पुढील पंचवीस वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री पदासाठी प्रतिदावा केला आहे. मुख्यमंत्री पदावरून भाजपने महाविकास आघाडीला घेरले असताना आगामी काळात मुख्यमंत्री कोणाचा याविषयी राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. या संभ्रमात महाविकास आघाडीतील आमदारांचा मात्र चांगलाच गोंधळ उडाला आहे.

संजय राऊतांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंचा पलटवार -राज्यात महाविकास आघाडीने नुकताच अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. कोरोना संसर्ग, पूरस्थिती, आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांवर सुरू असलेले कथित भ्रष्ट्राचाराचे आरोप, काही नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. महाविकास आघाडी सरकार अडीअडचणीतून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी, २५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, असा दावा केला आहे. सरकार पडण्याच्या तारखा देणाऱ्या भाजपला हा टोला असल्याचे बोलले जाते. मात्र उस्मानाबादच्या दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना महिला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार का, असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर महाराष्ट्राची जनता ठरवेल, मी कसे ठरवणार. परंतु, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या नेत्यांसह दर्शनाला येऊ असे साकडेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी तुळजाभवानीला घातले.

महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये संभ्रम -राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. दोन्ही पक्षांनी आपले महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दुसऱ्या आणि भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपला १४ मतांची आवश्यकता आहे. तर शिवसेनेला अपक्ष आणि घटक पक्ष सांभाळावे लागणार आहेत. अशातच राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाचा दावा केल्याने आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या निवडणुकीत कोणाला फटका बसेल, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा -मानेच्या व्याधीने त्रस्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १० नोव्हेंबरला स्पाईन सर्जरी करण्यात आली. तब्बल २० दिवस एचएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तर दुसरीकडे अधिवेशनात मुख्यमंत्री ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री बदलाची मागणी लावून धरण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट विधानभवन परिसरात मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, मात्र चार्ज रश्मी ठाकरेंना द्यावा, असे म्हटले होते. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी भाजपला फटकारले होते. आताही महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा झाल्यानंतर मंत्री अब्दुल सतार यांनी रश्मी ठाकरेंच्या नावाला प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे. त्यामुळे महिला मुख्यमंत्री झाला तर कोणाचा असावा, यावरूनच मतभेद समोर आले आहेत.

कोणताही राजकीय पक्ष आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दावे-प्रतिदावे करत आहेत. यात काही गैर आहे असे मला वाटत नाही, असे वरिष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक विष्णू सोनवणे यांनी सांगितले.

विश्वासघाताच्या पायावर कोणतेही सरकार उभे राहू शकत नाही. फार काळ हे सरकार टिकणार नाही. त्यामुळे पंचवीस वर्ष हे डोक्यातून काढून टाकावे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details