मुंबई - जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या वापरलेल्या पीपीई किट, हॅन्ड ग्लोज, मास्कपासून कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून जैव वैद्यकीय (बायो मेडिकल) कचऱ्याबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य समितीच्या सदस्या व नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी दिली.
जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे रुग्णांची व मृतांची संख्या वाढत आहे. मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 27 हजारावर तर मृतांचा आकडा 900 वर गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांपासून मृतदेह हाताळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर करावा लागत आहे. पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा वापर झाल्यावर त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. त्याला जैव वैद्यकीय कचऱ्यात टाकावे लागते. जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्याचप्रमाणे पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कची विल्हेवाट लावली जाते.
पालिका आणि खासगी रुग्णालयात तसेच इतर ठिकाणी वापरण्यात आलेले पीपीई कीट, ग्लोज, मास्क पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगेमध्ये एकत्र केले जातात. तसेच रुग्णालयातील इतर जैविक कचरा काळ्या बॅगेत गोळा करण्यात येतो. मुंबई महापालिकेने शहरातील जैव वैद्यकीय (बायो मेडीकल) कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट एसएमएस या कंपनीला दिले आहेत. या कंपनीचे देवनार डम्पिंग ग्राऊंडजवळ प्लान्ट आहे. या प्लान्टमध्ये पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा तसेच जैविक कचरा गोळा करून जाळला जातो. पीपीई कीट, हॅन्डग्लोज, मास्कचा कचरा जाळला जात आहे. त्यामुळे या कचऱ्यापासून मुंबईकरांना लागण होण्याची शक्यता नसल्याचे खान यांनी सांगितले.