मुंबई -महापालिकेच्या राणीबागेत गेले बावीस वर्षे सिंहाचे दर्शन झालेले नाही. गुजरात येथून सिंहाची जोडी आणली जाणार असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र तरीही गेल्या काही वर्षांत सिंहाची जोडी राणीबागेत आलेली नाही. यामुळे राणीबागेत गेल्या बावीस वर्षात सिंहाची डरकाळी ऐकू आलेली नाही. एकीकडे गुजरातमधून मुंबईत सिंह आले नसताना महाराष्ट्रातून मात्र गुजरातला हत्ती पाठवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बावीस वर्षे सिंहाचे दर्शन नाही -मुंबईत भायखळा येथे राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. या राणीबागेत अनिता आणि जिमी अशा दोन सिंहिनी तसेच एका वाघाचा बावीस वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर राणीबागेत सिंहाचे आणि वाघाचे दर्शन झाले नव्हते. त्यांची डरकाळीही ऐकू लागली नव्हती. राणीबागेत वर्षभरापूर्वी औरंगाबाद प्राणी संग्रहालयातून वाघाची जोडी आणण्यात आली आहे. या वाघाच्या जोडीने एका पिल्लाला जन्मही दिला आहे. मात्र गुजरात येथून दोन सिंह आणणार असल्याची गेले काही वर्षे सांगितले जात असले तरी हे सिंह राणीबागेत आलेले नाहीत.
सिंह येण्यात अडचणी काय -राणी बागेत सिंहाची जोडी आणण्यासाठी गुजरातच्या प्राणी संग्रहालयाला प्रस्ताव देण्यात आला होता. सिंहाच्या बदल्यात गुजरातला झेब्राची जोडी दिली जाणार आहे. ही झेब्राची जोडी इस्रायल येथून आणली जाणार आहे. इस्रायलने राणीबागेचा प्रस्ताव फेटाळला होता. आता पुन्हा नव्याने प्रस्ताव बनवून पाठवण्यात आला आहे. यामुळे इस्रायल येथून आलेली झेब्राची जोडी गुजरातला दिली जाणार आहे. त्या बदल्यात राणीबागेला गुजरात येथून सिंहाची जोडी दिली जाणार आहे. लवकरच ही सिंहाची जोडी राणीबागेत येईल, अशी माहिती वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली.
प्राणी आणण्याचा नियम - देशभरातील प्राणी संग्रहालयात कोणताही प्राणी आणायचा झाल्यास इतर प्राणी संग्रहालयातून आणावा लागतो. प्राणी संग्रहालयात आपसात करार करून प्राण्यांची आदलाबदल केली जाते. प्राण्यांची अदलाबदल करून आणण्याचा नियम असल्याची माहिती राणीबाग प्रशासनाकडून देण्यात आली.