मुंबई -मराठी जनतेला हिंदवी स्वराज्य स्थापन करुन छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या गुलामीतून मुक्त केले. मात्र छत्रपती शिवरायानंतर मराठी जनतेला संभाजीराजांनी स्वाभिमान शिकवला. अतिशय कमी कालावधीत छत्रपती संभाजीराजेंनी अचाट धैर्य गाजवले, अजोड पराक्रम केला. वयाच्या 14 व्या वर्षी बुद्धभूषणम हा ग्रंथ लिहून संस्कृत पंडीत असल्याचे सिद्ध केले. इतकेच नाही तर, मोगल सम्राटांना सळो की पळो करुन सोडले. त्या छत्रपती संभाजीराजेंची ही शौर्यगाथा खास ईटीव्हीच्या वाचकांसाठी.
संभाजी राजेंचा जन्म -छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 ला झाला. मात्र जन्मापासूनच त्यांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्या. संभाजी राजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाईचे निधन झाले. त्यानंतर जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला.
आग्रा मोहीम आणि सुटकेचा थरार -छत्रपती शिवाजी राजेंना मोगलांच्या दरबारी आग्र्याला बोलावणे आले, तेव्हा संभाजी राजे अवघ्या 9 वर्षाचे होते. मोगल बादशहाने कुटील कारस्थान करत शिवाजी राजेंना बंदिस्त केले, त्यावेळी स्वराज्याचे युवराज त्यांच्यासोबत होते. मात्र शिवरायांनी मोठ्या शिताफिने मोगलांच्या फितुरीचा सामना केला. मोगलांच्या हातावर तुरी देत महाराज युवराज संभाजी राजेंसह आग्र्यावरुन सुटले. युवराज संभाजी राजेंना मोगलांशी लढाईचे बाळकडू असे लहानपणापासूनच मिळत गेले.
संस्कृत पंडीत संभाजी राजे -संभाजी राजेंनी वयाच्या 14 व्या वर्षी बुद्धभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी शास्त्र, पुराण, धनुर्विद्या, काव्यालंकार आदी सर्व बाबींवर प्रकाश टाकला. वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहणारे संभाजीराजे प्रचंड अभ्यासू होते. त्यांनी आपल्या ग्रंथात राज्य कसे चालवावे, सैन्य, गडकिल्ले, आदी सगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.
अचाट धैर्य, अजोड पराक्रम, अजिंक्य योद्धा -छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी राजेंच्या तालमीत घडलेले अजिंक्य योद्धा होते. अतिशय कमी आयुष्य लाभूनही त्यांच्यासारखा पराक्रमी राजा इतिहासात दुसरा आढळत नाही. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा वारसा त्यांनी सक्षमपणे चालवला. त्यांच्या गनिमी काव्याने संभाजी राजेंनी मोगलांना पळता भुई कमी केली. संभाजी राजेंनी आपल्या हयातीत 120 लढाया लढल्या. त्यातील एकही लढाई ते हारले नाहीत. त्यामुळे इतिहासात अजिंक्य योद्धा म्हणून संभाजी राजेंचा गौरव केला जातो. मात्र अशा अजिंक्य योद्ध्याला मोगलांनी फितुरीने पकडून त्यांचे हालहाल केले. आज संभाजी राजेंची जयंती, त्यानिमित्त त्यांना ईटीव्ही भारतचा मानाचा मुजरा . . .