मुंबई - कोरोनाचा परिणाम यावर्षी देखील सणासुदीवर झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी सण साजरे करण्यावर बंधने आली आहेत. मागील वर्षी कोरोनाची सुरुवात असल्यामुळे सर्व मोठ्या सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणे टाळले होते. यंदा नियमाचे पालन करत ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय बहुतेक मंडळांनी घेतल्याचे दिसत आहे. याबाबत ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट...
मागच्या वर्षी कोरोनामुळे अनेक मोठ्या मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणे टाळले होते. पण यंदाच्या वर्षी लालबागचा राजा, जीएसबी, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्ली आदी मंडळं कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करणार आहेत. यामध्ये ऑनलाईन दर्शनावरती भर देण्यात येणार आहे. तसेच विभागातून वर्गणी न घेणे, विसर्जन मिरवणूक रद्द करून कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करणे, असे अनेक महत्त्वाचे निर्णय अनेक मंडळानी घेतले आहेत.
यंदा लालबागच्या राजाचे ऑनलाईन दर्शन, याबाबत ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट लालबागच्या राजाची मूर्ती राहणार चार फुटाची
दरवर्षी लालबागचा राजा म्हणजे सिंहासनावर आरुढ अशी गणपतीची मोठी मूर्ती डोळ्यांपुढे येते. पण यंदा कोरोना संकटाचे भान ठेवून सिंहासनावर आरुढ गणपतीची चार फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरवर्षी लालबागचा राजा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळते. अनेक सेलिब्रेटी येतात. पण कोरोना संकटात गर्दी टाळण्यासाठी मंडळाने भक्तांना गर्दी टाळा आणि ऑनलाईन दर्शन घ्या, असे आवाहन केले आहे. मागच्या वर्षी कोरोना काळात रक्तदान शिबीर घेऊन लालबागचा राजा मंडळाने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे टाळले होते. पण या वर्षी मंडळ चार फूट उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन साधेपणाने उत्सव साजरा करणार आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन उत्सव साजरा केला जाईल. भक्तांना ऑनलाईन पद्धतीने गणरायाचे दर्शन घेता येईल, असे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.
चांदीच्या गणेशमूर्तीची होणार चिंचपोकळीत प्राण प्रतिष्ठापना
मुंबईतील 102 वर्ष जुने गणेशोत्सव मंडळ म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी. यंदा मोठ्या मूर्तीऐवजी किंवा उत्सवाऐवजी केवळ परंपरा राखत सण साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. यानुसार यंदादेखील मंडळाकडील चांदीच्या गणेशमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मागील वर्षी देखील याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यावेळी आम्ही जास्तीत जास्त उपक्रमावर भर दिलेला आहे. ऑनलाईन दर्शनाची सुविधा आम्ही ठेवणार आहोत. तसेच जवळील लोकांसाठी आळीपाळीने दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले आहे.
जी.एस.बी सेवा मंडळसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सुवर्ण गणपती म्हणून नावलौकिक असणारा आणि मुंबईतील प्रमुख गणेशोत्सव मंडळापैकी एक मंडळ म्हणजे जी.एस.बी सेवा मंडळ, किंग सर्कल येथे या बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. १९५४ साली या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाने देखील ऑनलाईन दर्शनावर भर देण्याचे ठरविले आहे. मागील वर्षी देखील नियमाचे पालन करत मंडळाने गणेशोत्सव साजरा केला होता. यावर्षीदेखील त्याच धर्तीवर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भक्तांसाठी कुरियरने प्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याचे मंडळाचे विश्वस्त अमित पै यांनी सांगितले.
कोरोनामुळे मूर्तिकारांचे झाले अतोनात नुकसान
मुंबईमध्ये 12 हजारांहून जास्त सार्वजनिक मंडळ आहेत. त्या तुलनेत मूर्तिकारांची संख्या अतिशय कमी आहे. गणेशोत्सवामध्ये करोडोंची उलाढाल होते. यंदा उंचीची मर्यादा कायम असल्याने मूर्तिकारांना मोठे नुकसान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मूर्तिकार आणि समन्वय समिती उंचीची मर्यादा वाढवावी यासाठी प्रयत्नशील होती. मात्र अजूनही याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात असलेल्या चेंडूचा निकाल लागला नाही. त्यामुळे अनेक मंडळांनी चार फुटाची बाप्पाची मूर्ती विराजमान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र या निर्णयामुळे मूर्तिकारांचे मोठे नुकसान झालेले आहे.